विटा; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या खानापुरातील उपकेंद्रासाठी १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद मंजुर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी आज (दि. २२) दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आर्थिक तरतुदीचे आदेश दिले आहेत असंही पाटील यावेळी म्हणाले. (Shivaji University Sub-Centre)
सांगली जिल्हातील अनेक तालुक्यांना गावांना शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा फायदा होणार असल्याचे वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले. यावेळी ते म्हणाले की, खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु झाले तर दुष्काळी भागाला न्याय मिळेल शिवाय खानापूरसह आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, कडेगाव, पलूस, तासगाव आणि माण तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून खानापूर उपयोगी ठरेल. (Shivaji University Sub-Centre)
यावर अजित पवार यांनी यापूर्वीच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना संबंधित प्रकरण तात्काळ शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून त्वरित मागणी करून घ्यावी व खानापूर येथे हे उपकेंद्र करण्याबाबत कारवाई करा असे निर्देश दिले होते. वैभव पाटील स्वतः सिनेट सदस्य असल्याने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये व विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये (व्यवस्थापन परिषदेत) तसा ठराव मंजुरीसाठी विशेष प्रयत्न करून ठराव मंजूर केला होता. तसेच खानापूर येथे जागा निश्चिती ठराव आणि जागेच्या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कॉऊन्सिलमध्ये ठराव मंजूर करून घेतला होता. त्यानंतर विद्यापीठाच्या पथकाने खानापूर येथे येऊन जागा पाहणीही केली होती. त्यानंतर आज गुरुवारी माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई मंत्रालयात भेट घेतली. यावेळी वैभव पाटील यांनी प्रस्तावानुसार उपकेंद्रासाठी १०० कोटीची आर्थिक तरतुदीची मागणी केली. त्या वर उपमुख्यमंत्री पवार यांनी उपकेंद्रासाठी १०० कोटीची आर्थिक तरतूद मंजुरीसाठीचे तात्काळ आदेश दिले आहेत असे सांगत वैभव पाटील यांनी याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांचे विशेष आभार मानले आहेत.