file photo 
Latest

औरंगजेबाचे महिमामंडन सहन करणार नाही : उपमुख्यमंत्री फडणवीस

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  औरंगजेबाचे पोस्टर्स, मिरवणुकीत फोटो, स्टेटस हा योगायोग नाही. औरंगजेब देशातील मुस्लिमांचा हिरो कधीच होऊ शकत नाही. राज्यात धर्म आणि जातीच्या आधारे भेदभाव करणार नाही. तथापि, औरंगजेबाचे महिमामंडन केले तर ते सहन केले जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिला.

बारसू येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पात गुंतवणूक करणार्‍या सौदी आराम्को कंपनीने पाकिस्तानात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्तालाही त्यांनी दुजोरा दिला. बारसूतील प्रकल्पाला उशीर केल्यामुळे आराम्कोने घेतलेल्या निर्णयाने पाकिस्तानला फायदा होणार आहे. याही स्थितीत भारतातील सरकारी तेलकंपन्यांच्या माध्यमातून बारसू येथील प्रकल्प पूर्णत्वाला नेला जाईल. लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

विरोधक आणि सत्ताधार्‍यांच्या एकत्रित अंतिम आठवडा प्रस्तावाला फडणवीस यांनी उत्तर दिले. सुमारे तासभर चाललेल्या उत्तरात फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था, बारसूसह उद्योग, गुंतवणूक, महापालिका निवडणुकांसह विविध मुद्द्यांवरील विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले.

कोर्टाच्या निर्णयामुळे निवडणुका लांबल्या

राज्य सरकार मुंबई महापालिकेच्या निवडणुका टाळत असल्याचा विरोधकांच्या आरोपालाही फडणवीस यांनी उत्तर दिले. आयोगाने दिलेली स्थगिती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुका लांबल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापुढे आपण नाही. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. जर मुंबई महापालिकेला हा निर्णय लागू नसेल तर आपण निवडणूक आयोगाकडे जाऊ आणि त्यांना निवडणूक घेण्यासाठी विनंती करू, असे उत्तर फडणवीस यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर दिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आधी कर्नाटक आणि नंतर गुजरात परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर गेला. मात्र, मागील एका वर्षात एक लाख चार हजार 825 कोटींची गुंतवणूक राज्यात झाली आहे, असे ते म्हणाले.

बारसू आंदोलकांना बंगळूरमधून पैसा

ज्यांना देशाचा विकास नको आहे तीच माणसे आरेच्या आंदोलनात, बुलेट ट्रेनच्या आंदोलनात, बारसूच्या आंदोलनात दिसत आहेत. यातील काही माणसे नर्मदेच्याही आंदोलनात होती. या आंदोलकांचे रेकॉर्ड ट्रेस केले तर ही माणसे वारंवार बंगळूरला जाताहेत. यांच्या अकाऊंटमध्ये तिथून पैसे येतात. ग्रीन पीस या बंदी असलेल्या संघटनेच्या संपर्कात हे लोक आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT