घाटकोपर; पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सण आणि निवडणुका असे दोन्ही उत्सव सध्या तोंडावर आहेत. दिवाळी उत्सव हा राजकीय नेतेमंडळींचे प्रचाराचे चांगले माध्यम असते. दिवाळीत कंदील हा लोकांना आकर्षित करीत असतो.म्हणून यंदाच्या वर्षी राजकीय पक्षांचे आकाश कंदील खरेदीकडे सर्व इच्छुक उमेदवारांचा भर आहे. असे भले मोठे चौकात लावण्यासाठी राजकीय प्रचार करणारे कंदील ला मागणी वाढली आहे.घाटकोपर च्या असल्फा विभागात नितीन खोपकर हे गेले वीस वर्ष आकाश कंदील बनविण्याचा व्यवसाय करतात.दोन वर्षात अश्या राजकीय प्रचारांचे कंदीलला मागणी प्रचंड वाढली आहे. असल्याचे खोपकर सांगतात. गेल्यावर्षी पालिकेच्या निवडणुका लागतील अशी शक्यता होती म्हणून विक्री जोरदार होती, तर यंदा विधानसभा आणि लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने विविध राजकीय पक्षांच्या कंदिलांना मागणी असल्याचे ते सांगतात.
दिवाळीत विविध पद्धतीने प्रचार सुरू असतोच, पण आकाश कंदील हा नागरिक मोठी प्रमाणात पहातात, त्यामुळे असे आकाश कंदील खरेदी करीत असल्याचे मनसेचे पदाधिकारी राहुल चव्हाण म्हणाले.त्यामुळे या राजकीय पक्षांच्या कंदिलाच्या झगमगाटात दिवाळी तर उजळून निघेलच, पण राजकीय पक्षांचा , उमेदवारांचा प्रचार ही जोरदार होताना चौका चौकात दिसणार आहे.