नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाचे सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी (दि.९) लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संवाद साधला. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी देशाची सुरक्षा, सार्वभौमता यांची सुनिश्चिती करण्यासाठी लष्कराने दाखवलेल्या सुसज्जतेबद्दल प्रशंसा केली. संरक्षणमंत्री म्हणाले, भारतीय लष्कर आणि त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. कोणतेही आकस्मिक संकट आले, तर आम्ही सदैव तयार असले पाहिजे आणि म्हणूनच परिचालनविषयक पूर्वतयारी ही सर्वोच्च स्तरावर असली पाहिजे, असे आवाहन सिंह यांनी लष्कर नेतृत्वाला केले.
अब्जावधीपेक्षाही जास्त भारतीय नागरिकांचा भारतीय लष्करावर देशातील सर्वाधिक विश्वासार्ह, प्रेरणादायक सैन्य म्हणून असलेल्या विश्वासाची सिंह यांनी पुन्हा ग्वाही दिली. नागरी प्रशासनाला त्यांनी मदत मागितली तेव्हा ती तत्परतेने पुरवण्यासोबतच आपल्या सीमांचे रक्षण करण्यात आणि दहशतवादाशी लढण्यात लष्कराच्या उठावदार कामगिरीवर त्यांनी ठळक प्रकाश टाकला. संरक्षणमंत्र्यांनी सैन्याची कोणत्याही संकटाच्या समयी असलेली सुसज्जता आणि उच्च दर्जाच्या क्षमतांचा आपण प्रत्यक्ष अनुभव आपल्या सीमेवरील चौक्यांना दिलेल्या भेटीदरम्यान आलेले अनुभव याबद्दल प्रशंसा केली. प्रमुख शैक्षणिक संस्थांसह नागरी उद्योगांच्या सहकार्याने लष्कर जे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्याद्वारे आत्मनिर्भरता किंवा स्वदेशीकरणातून आधुनिकीकरणाच्या दिशेने प्रगती करत आहे,त्याबद्दल लष्कराची प्रशंसा केली.
भारतीय लष्कराच्या कमांडर्सची परिषद, सर्वोच्च स्तरावरील द्वैर्वाषिक मेळावा सध्या सुरू आहे. परिषदेदरम्यान, भारतीय लष्करातील सर्वोच्च नेतृत्व सध्याची सुरक्षा स्थिती आणि सध्याच्या सुरक्षा यंत्रणेला असलेली आव्हाने यांच्याशी संबंधित सर्व पैलूंवर सर्वसमावेशक विचारविनिमय करत आहे. या व्यतिरिक्त, लष्कराची संघटनात्मक पुनर्रचना, पुरवठा साखळी, प्रशासन. मनुष्यबळ व्यवस्थापन, स्वदेशी बनावटीच्या उत्पादनाच्या द्वारे आधुनिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञान वापरणे यांच्याशी संबंधित मुद्यांवर या परिषदेत भर दिला जात आहे. परिषदेच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वाने संरक्षण मंत्र्यांशी संवाद साधला.