Latest

पुन्हा हुलकावणी!

Arun Patil

देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचे स्वप्न रविवारी भंगले. संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या रोहित शर्माच्या टीम इंडियाला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागेल, अशी पुसटशीही शंका नसताना ऑस्ट्रेलियाने विश्वचषक अक्षरश: हिसकावून नेला. ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज ट्रॅव्हिस हेड याने मार्नस लाबुशेन याच्या साथीने केलेल्या भागीदारीने भारताचे स्वप्न भंगले. त्यामुळे इतर संघांसोबत खेळणे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे यात खूप फरक आहे, याची भारतीय संघाला पुन्हा प्रचिती आली. वास्तविक रोहित शर्माइतक्याच फॉर्मात असलेला विराट कोहली, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा, के. एल. राहुल अशी मजबूत फळी भारतीय संघात होती. ही फळी विश्वचषक मिळवून देईल याची खात्री देशातील क्रिकेटप्रेमींना होती. मात्र, अहमदाबादच्या भव्य अशा नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांची निराशा झाली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स या अंतिम सामन्यापूर्वी असे म्हणाला होता की, लाखो प्रेक्षकांच्या जल्लोषाला शांत होताना मला पाहायचे आहे. त्याने ते करून दाखविले. अर्थात, खेळ म्हणजे जय-पराजय आलाच. दोनपैकी जो संघ उत्तम कामगिरी बजावतो, त्याचा विजय निश्चित असतो. अंतिम सामन्यात हेच बघायला मिळाले.

आपल्या देशाला विश्वचषक मिळाला नाही, याचे शल्य प्रत्येक क्रिकेटप्रेमीला आहे. परंतु हा सामना पाहणार्‍या प्रत्येकाला प्रतिस्पर्धी संघ वरचढ होता, हेदेखील मान्य करावे लागेल. क्रिकेटमध्ये केवळ फलंदाजी आणि गोलंदाजीच नव्हे, तर क्षेत्ररक्षण आणि कर्णधाराचे अचूक निर्णयही महत्त्वाचे ठरतात. पहिल्याच चेंडूवर सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा झेल स्लिपमध्ये सुटला. त्याचवेळी संपूर्ण संघाला सावरून क्षेत्ररक्षणावर लक्ष केंद्रित करावयास हवे होते. यानंतर तिसर्‍याच चेंडूवर विराटने वॉर्नरचा झेल घेतला, त्यामुळे मोठा धोका टळला. सुरुवातीलाच तीन विकेट घेतल्यामुळे भारतीय संघाची बाजू वरचढ झाली; पण त्यानंतर सामना संपायला दोन चेंडू शिल्लक (43वे षटक) असेपर्यंत एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे 241 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहज गाठले.

कर्णधार रोहित, विराट आणि के. एल. राहुल यांनी उत्तम खेळी केली. विराटने 2019 च्या विश्वचषकाप्रमाणेच यावेळीही सलग पाच सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती. शमीने या विश्वचषकात तब्बल 24 विकेट घेतल्या होत्या आणि बुमरानेही 20 विकेट घेतल्या; परंतु ते संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अर्थात मैदानावरील वास्तवही या पराभवास कारणीभूत ठरले. 240 धावांत बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला गारद करण्यासाठी खेळपट्टीची जी साथ हवी होती, ती प्रमुख गोलंदाजांना मिळाली नाही. दुसर्‍या इनिंगमध्ये चेंडू ना वळत होता, ना उसळत होता, ना स्विंग होत होता. त्यामुळे विकेट घेताना गोलंदाजांची दमछाक झाली. दर चार वर्षांनी भरविल्या जाणार्‍या क्रिकेटच्या या कुंभमेळ्यात शेवटपर्यंत पकड कायम ठेवलेल्या भारताला ऑस्ट्रेलियाने धक्का दिला.

भारताने 1983 मध्ये पहिला विश्वचषक जिंकला तेव्हा त्या संघात जे खेळाडू होते, त्यांचे गुणगान आजही प्रत्येक क्रिकेटप्रेमी गातो. त्यावेळी जन्म न झालेले क्रिकेटप्रेमीही त्या सामन्यांचा आनंद चलचित्रांतून लुटतात आणि त्यातील कर्णधार कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, के. श्रीकांत यांच्यासह प्रत्येक खेळाडूला जादूगार मानतात. या विश्वचषकाची एवढी महती आहे. म्हणूनच यंदाही लाखो क्रिकेटप्रेमींनी हा सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी अहमदाबादची वाट धरली होती. अर्थात भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चौथ्यांदा अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली आहे. त्यापैकी 1983 आणि 2011 मध्ये या संघाने विश्वचषक जिंकला. 1983 मध्ये भारताने वेस्ट इंडिजला, तर 2011 मध्ये श्रीलंकेला पराभूत केले. नव्हे, भारताला हरविण्याचे स्वप्न ऑस्ट्रेलियाच पाहू शकतो हे आतापर्यंत झालेल्या सामन्यांमधून क्रिकेट जगताला पटले आहे.

भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पाचवेळा धडक मारली. मात्र त्यावेळीही निराशा पदरी पडली. अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी 'हल्ली क्रिकेट अति झाले', अशी टिप्पणी अनेकवेळा केली आहे. या खेळात फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण नव्हे, तर शारीरिक तंदुरुस्ती सर्वांत महत्त्वाची आहे. यंदाच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील प्रत्येक खेळाडू याद़ृष्टीने मजबूत होता, म्हणून हवेतील किंवा सीमारेषेकडे निघालेल्या चेंडूवर झडप घालून सुमारे 40 धावा त्यांनी वाचविल्या आणि भारताला 300 चा पल्ला गाठण्यापासून रोखले. भारत या आघाडीवर कमकुवत ठरला. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 151 एकदिवसीय सामने झाले. त्यात 10 सामने अनिर्णीत राहिले.

भारताने 57 आणि ऑस्ट्रेलियाने 84 सामने जिंकले. यंदाच्या अंतिम सामन्यानंतर समाजमाध्यमांवर भारतीय संघावर चौफेर टीका झाली. या सामन्याची चातकाप्रमाणे वाट पाहणार्‍या आणि क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणार्‍या प्रत्येकाला हा पराभव जिव्हारी लागला हे खरेच; पण या धक्क्यातूनही आपला संघ सावरेल आणि यावेळी झालेल्या चुका सुधारेल, यात तीळमात्र शंका नाही. त्यासाठी अंतिम सामन्यात ज्या त्रुटी राहिल्या, त्या सुधारण्यावर पुढील चार वर्षे भर द्यावा लागणार आहे. शिवाय टी-20 सामन्यांच्या माध्यमातून खेळाडूंवर अपेक्षांचे किती ओझे लादायचे, याचाही विचार करावा लागणार आहे.

यंदाच्या संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे लागले. कोणत्याही सामन्यात भाकीत वर्तवणे अशक्य असते. पण स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी पाहून संघ विश्वचषक स्पर्धेवर आपले नाव कोरणार असे प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीला वाटत होते. पण, अखेर निराशा पदरी पडली. खरे तर संघावर टीका-टिप्पणी करण्याऐवजी संघाला आगामी काळातील कामगिरी करण्यासाठी पाठिंबा आणि प्रोत्साहन द्यावे लागेल. हेच खर्‍या क्रिकेटप्रेमीचे लक्षण आहे. क्रिकेटचे मैदान किती बेभरवशाचे असते, यश कसे हुलकावणी देते याचा अनुभव या सामन्याने दिलाच; पण पुढील विजयासाठी आणखी तयारीची संधीही दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT