मुंबई, पुढारी वृत्तसेवा : नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात आता शिक्षक प्रशिक्षणाचे टप्पे बदलणार आहेत. त्यानुसार वर्षानुवर्षे शिक्षक घडविणारा डीएडचा अभ्यासक्रम बंद होणार आहे. त्याऐवजी आता शिक्षक होण्यासाठी चार वर्षांचा बीएड कोर्स करावा लागेल. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर डीएडचा कोर्स करून अनेकजण प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. आता राज्यातील डीएड कॉलेज बंद होणार आहेत.
येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. दरम्यान, डीएड कोर्स मोडीत निघणार असल्याने आतापर्यंत शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असणार्या पदविकाधारकांचे काय, असा प्रश्न उभा राहणार आहे.
नवा अभ्यासक्रम असा
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षाचा हा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येणार आहे. तीन वर्षाची बॅचलर डिग्री पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला दोन वर्षांचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स करता येईल; तर चार वर्षांची डिग्री पूर्ण झालेल्या किंवा पदव्युत्तर (मास्टर) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला एक वर्षाचा बीएड इंटिग्रेटेड कोर्स शिक्षक होण्यासाठी करता येणार आहे. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वीच नव्या शैक्षणिक धोरणात बदल केल्यानंतर राज्यात त्याची अंमलबजावणी होणार आहे. भविष्यात बदलणार्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊ न अध्यापन शास्त्रातील नव्या तंत्रज्ञानाचा, त्यासोबतच नव्या गोष्टींचा या इंटिग्रेटेड कोर्समध्ये समावेश केलेला आहे, त्यासोबतच या अभ्यासक्रमामध्ये व्यवहारिक प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे.
याआधी बारावी झाल्यानंतर डीएडचा कोर्स आणि नंतर नोकरी असा कल होता. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या कोर्सकडे वळू लागल्यानंतर राज्यात डीएड महाविद्यालये सुरू झाली. यामध्ये खासगी, विनाअनुदान तत्वावरील महाविद्यालयांचा समावेश होता. मात्र टीईटी परीक्षा, शिक्षक भरती रखडणे आदी कारणांमुळे डीएडच्या अभ्यासक्रमाला असलेली मागणी कमी होऊ न अनेक महाविद्यालये बंद पडली.