पुणे; पुढारी वृत्तसेवा : जी- 20 परिषदेचे सदस्य ज्या मार्गावरून प्रवास करणार आहेत, त्या मार्गावरील नागरिकांनी घरांवर, इमारतींवर विद्युत रोषणाई करून सजावट करावी. सुरक्षेचे नियम पाळून हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन पाहुण्यांचेही स्वागत करावे. तसेच राजकीय व्यक्तींनीही टीका-टिपण्णी न करता, सल्ला आणि सूचना कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
शहरात आयोजित होत असलेल्या जी -20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (दि. 9) तयारीचा आढावा घेतला. तसेच अधिकार्यांसमवेत विमानतळ ते जे. डब्ल्यू. मॉरिएट हॉटेल या दरम्यानच्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह प्रशासन अधिकार्यांचा समावेश होता.
पाहणीनंतर पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, 'जी-20 परिषदेच्या बैठका मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या चार शहरांमध्ये होणार आहेत. यामध्ये पुण्यात 16 व 17 जानेवारीसह जून आणि सप्टेंबरमध्ये बैठका होणार आहेत. यासाठी पुण्यात 16 व 17 तारखेला 37 देशांतील 120 प्रतिनिधी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुशोभिकरण, स्वागत, सुरक्षितता, संस्कृति-विकास याबाबत आढावा घेऊन सूचना केल्या.'
शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा कशा पद्धतीने दिल्या गेल्या, त्या कोणत्या टप्प्यांवर दिल्या गेल्या याचा अभ्यास करण्यासाठी ही परिषद होत आहे. यामध्ये अनुभवाची देवाण-घेवाण होणार आहे. शहरातील प्रकल्पांचेही सादरीकरण केले जाणार आहे. आपल्या गोष्टी त्या सदस्यांनी आपल्या देशात न्याव्यात असा आपला प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले.
सुरक्षेचे नियम पाळून नागरिकांनी तिरंगा झेंडे हातात घेऊन परिषदेच्या सदस्यांचे स्वागत करावे, वाहतूक
कोंडीची गैरसोय स्वागताचा भाग म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे, करण्यात आलेली सजावट कोणी खराब करत असेल तर नागरिकांनी त्यांना प्रतिबंध करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी रंगरंगोटीवर पिचकार्या मारल्या आहेत. अशा ठिकाणची परिस्थिती दरूस्त करण्यासाठी एक टीम तयार ठेवण्यात आली आहे. चार दिवस आंदोलने, उपोषणे होणार नाहीत, याची काळजी जिल्हाधिकारी घेतील, असेही पाटील म्हणाले.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण
विमानतळापासून सेनापती बापट रस्त्यापर्यंत परिषदेच्या सदस्यांचे स्वागत करणे, पुणे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणे यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनेही तयारी करण्यात आली आहे. बैठकांदरम्यान जे. डब्ल्यू. मॉरिएट येथे विविध स्टॉल, लहान-लहान चित्रफिती दाखविणे, सदस्यांसाठी विद्यापीठात 16 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या मेजवानीच्या वेळी लावणी, जुगलबंदी, गोंधळ, गणेशवंदना, बँंडपथक, मर्दानी खेळ आदींचे सादरीकरण करणे याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. हेरिटेज ठिकाणांची यादी सादर केली असून, लवकरच ते कोणत्या ठिकाणांना भेट देणार आहेत, हे स्पष्ट होईल, अशी माहिती यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
चर्चासत्रांचे आयोजन
जी- 20 परिषदेच्या बैठका 15 ते 17 जानेवारी दरम्यान होणार आहेत. त्यापूर्वी शहरात सायकल रॅली व स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. विद्यापीठ ते शनिवारवाडा या दरम्यान एनएसएसतर्फे 12 तारखेला रॅली असेल, तसेच 13 तारखेला देशातील प्रमुख महापालिका आयुक्तांचे चर्चासत्र , 14 तारखेला विद्यापीठात चर्चासत्र आणि एमआयटी व सिम्बायोसिस येथेही चर्चासत्राचे आयोजन केल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
टीका न करता सूचना कराव्यात
जी -20 परिषदेच्या माध्यमातून देशाची प्रतिमा जगासमोर जाणार आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे आणि मनसेसह सर्वच राजकीय पक्षांना विनंती आहे की, टीका-टिप्पणी न करता, आपल्या सूचना कराव्यात. त्या सकारात्मक पद्धतीने घेऊन तसे बदल केले जातील. आपण घरात कार्यक्रम असल्यावर जशी तयारी करतो, रंगरंगोटी करतो, पडदे लावतो, तशीच तयारी शहरात करावी लागणार आहे. सर्वांनी ती सकारात्मकरितीने घ्यावी, असेही आवाहन पाटील यांनी केले.
चार दिवस मेट्रोचे काम बंद
परिषदेदरम्यान शहरातील कोणत्याही रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली जाणार नाही. परिषदेच्या सदस्यांसाठी एक ट्रॅक तयार केला जाणार आहे. तो केवळ त्यांच्यासाठीच असेल. मात्र, परिषदेचे सदस्य प्रवास करणार्या भागातील मेट्रोची कामे 11 तारखेपासून बंद ठेवण्यात येणार आहेत. काम बंद ठेवल्यानंतर वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध होईल, याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त 'मेट्रो'ला देतील, असेही पाटील यांनी सांगितले.