मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पर्यटकांच्या लाडक्या माथेरानच्या मिनी ट्रेनला आता सलून डब्याची जोड देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. हा एसी डब्बा आठ आसनी असून पूर्व नोंदणी केली तर रात्रीच्या मुक्काम देखील प्रवासी या डब्यात करू शकतील. परंतु त्यासाठी पर्यटकांना तब्बल एकाच दिवशी राऊंड ट्रिपसाठी ३२ हजार ०८८ रुपये, आठवड्याअखेरीस (वीकेंडला) ४४ हजार ६०८ रुपये करांसह आकारण्यात येणार आहे.
नेरळ ते माथेरान दरम्यान मिनी ट्रेन चालविण्यात येते. तिला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद आहे. पर्यटकाच्या वाढत्या मागणीनुसार मध्य रेल्वेने मिनि ट्रेनला सलून डबा जोडण्याचा निर्णय घेतला. पर्यटक एकूण भाड्याच्या २० टक्के आगाऊ रक्कम भरून प्रवासाच्या तारखेच्या सात दिवस अगोदर १० हजार रुपये सुरक्षा ठेवीसह वातानुकूलित सलून बुक करू शकतात. उर्वरित ८० टक्के प्रवासाच्या तारखेच्या ४८ तास अगोदर रक्कम भरावी लागेल, असे न केल्यास आगाऊ रक्कम आणि सुरक्षा ठेव जप्त केली जाईल आणि बुकिंग रद्द झाले असे मानले जाणार आहे. ४८ तासांच्या आत बुकिंग रद्द केल्यास परतावा दिला जाणार नाही.
• नेरळ ते माथेरान : नेरळहून सकाळी ०८.५० वाजता सुटून माथेरानला सकाळी ११.३० वाजता पोहोचेल. नेरळहून सकाळी १०.२५ वाजता सुटेल आणि माथेरानला दुपारी ०१.०५ वाजता पोहोचेल.
• माथेरान ते नेरळ : माथेरान हुन दुपारी २.४५ वाजता सुटून नेरळला दुपारी ४.३० वाजता पोहोचेल. माथेरानमधून दुपारी ४.०० सुटून नेरळला संध्याकाळी ६.४० वाजता पोहोचेल.
• रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप : आठवड्यातील दिवशी ३२ हजार ०८८ रुपये करांसहीत आणि त्याव्यतिरिक्त दीड हजार रुपये प्रति तास
• विकेंडला रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप प्रवासासाठी ४४ हजार ६०८ रुपये करांसह आणि अन्य शुल्कासह १,८०० रुपये प्रति तास आकारले जातील..