Latest

Indian Sailors In Qatar : कतार न्यायालयाचा भारतीय नौसैनिकांना दिलासा, मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Indian Sailors In Qatar : कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या आठ भारतीय माजी नौसैनिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दाहरा ग्लोबल प्रकरणात कतारमधील न्यायालयाने या आठ जणांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. यामुळे भारत सरकारने कतार सरकारकडे सर्वोच्च पातळीवर केलेल्या शिष्टाईला यश आले आहे. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर निकालाची प्रतीक्षा असून पुढील कायदेशीर पावले उचलण्यासाठी तज्ज्ञांशी संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

भारतीय नौदलाचे आठ माजी अधिकारी ऑगस्ट २०२२ पासून कतारच्या तुरुंगात आहेत. हे सर्वजण कतारमधील अल दहरा या खासगी कंपनीसाठी कम करत होते. या सर्वांवर कतार प्रशासनाने इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप ठेवून तुरुंगात डांबले होते. कतारच्या न्यायालयाने २६ ऑक्टोबरला या आठही जणांना हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर खळबळ उडाली होती. या आठ नौदल अधिकाऱ्यांमध्ये कॅप्टन नवतेजसिंह गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन विरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला,कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश यांच्यासह राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आलेले निवृत्त कमांडर पूर्णांदू तिवारी यांचाही समावेश आहे. यानंतर ३० ऑक्टोबरला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या आठही जणांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सरकारतर्फे मदतीची ग्वाही दिली होती. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने कतारमधील भारतीय राजदुतांमार्फत हा विषय तेथील प्रशासनाकडे उपस्थित केला होता. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील यात हस्तक्षेप करून कतारच्या सर्वोच्च नेतृत्वाशी बातचित केली होती. त्यापार्श्वभूमीवर कतारच्या कोर्ट ऑफ अपिल न्यायालयाकडून या आठ जणांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. या सुनावणीच्या दरम्यान भारताचे राजदूत तसेच आठही जणांचे कुटुंबिय न्यायलायत उपस्थित होते. भारत सरकारने या कायदेशीर लढाईसाठी स्पेशल काउन्सिल नेमले होते.

या घटनाक्रमानंतर परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करून प्रतिक्रिया व्यक्त केली. दाहरा ग्लोबल प्रकरणात कतारच्या अपील न्यायालयाचा आजच्या निकालाची नोंद घेतली आहे. या निकालामध्ये (आठ जणांची) शिक्षा कमी करण्यात आली आहे. सविस्तर निकालाची प्रतीक्षा आहे. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी तज्ज्ञांचे पथक तसेच आठ जणांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आहोत. कतारमधील भारतीय राजदूत आणि इतर अधिकारी आज अपील न्यायालयात कुटुंबीयांसह उपस्थित होते. या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच सरकार या नौसैनिकांच्या पाठीशी उभे असून त्यांना सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर मदत करत राहू. आम्ही हे प्रकरण कतारी अधिकार्‍यांकडेही मांडत राहू. या खटल्याच्या गोपनीय आणि संवेदनशील स्वरूपाच्या कार्यवाहीमुळे, या टप्प्यावर अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT