नवी दिल्ली; पुढारी डेस्क : अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी, बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड सागर पांडे, कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जीममध्ये ट्रेड मिलवर व्यायाम करत असताना भोवळ आली आणि पुढे ते मरण पावले. व्यायामशाळांतून अशी बरीच प्रकरणे वर्षभरात समोर आली आहेत. माझ्या वडिलांमध्ये हृदयविकाराची कोणतीही लक्षणे नव्हती, त्यांनी याआधी साधी कळ आल्याची तक्रारही कधी केली नव्हती, असे राजू श्रीवास्तव यांच्या मुलीचे म्हणणे आहे. त्यात आता अभिनेता सुनील शेट्टी यांनीही, सप्लिमेंटस् आणि स्टेरॉईडमुळे अशा घटना घडत असल्याचे म्हटलेले आहे.
जीममधील व्यायामादरम्यानचे बहुतांश मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने नव्हे, तर अचानक हृदयक्रिया बंद पडल्याने झालेले आहेत, असा दावाही सुनील शेट्टी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. योग्य तो आहार आणि पुरेशी झोप नसेल, तर ही बाबदेखील घातक ठरू शकते. कोरोनानंतर सर्वांनीच, विशेषत: व्यायाम करणार्यांनी (डी-डायमर टेस्ट) आपल्या रक्तात गुठळ्या तर होत नाहीहेत ना, याची चाचणी करून घ्यावी. तसे होत असेल आणि त्यात व्यायामाची भर असेल; तर ही बाब घातक ठरू शकते, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
हृदयविकारग्रस्तांना व्यायामाचा सल्ला दिला जातो, तेव्हा तो जीममधील व्यायामाचा नसतोच. 40 मिनिटांत 4 किलोमीटर चालून रुग्ण तंदुरुस्त राहू शकतात. ट्रेड मिलवर 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवू नये. एरोबिक्सही थोडा वेळच करावे.
जीममधील व्यायामादरम्यानचे बहुतांश मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने नव्हे; तर अचानक हृदयक्रिया बंद पडल्याने झालेले आहेत.
– सुनील शेट्टी, अभिनेता