पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवसा कडक तडाका, रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका असे विचित्र वातावरण आहे. दरम्यान शनिवारी राज्यात पुणे शहरात नीचांकी 9.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान महाराष्ट्र, गुजरात तसेच गोव्याच्या बहुतांश भागात पुढील तीन दिवस कमाल तापमान चढेच राहणार आहे.
विशेषत: राज्यात कमाल तापमनाचा पारा 39 अंशांच्या आसपास राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वातावरणात चढ-उतार दिसून येत आहे. हिमालयीन भागासह उत्तर भारतात सातत्याने हवामानात बदल होत असल्यामुळे राज्यात देखील बदल होत असल्याचे दिसून आले आहे. पुणे शहर आणि आसापसच्या भागात शनिवारी किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली घसरला.