मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची आई अमिना बी यांच्या नावे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके या गावात असलेल्या चार मालमत्तांपैकी दोन मालमत्तांसाठी शुक्रवारी लिलावात बोली लावण्यात आली. या चार मालमत्तांची एकत्रित किंमत सुमारे 19 लाखांच्या घरात होती. चारपैकी दोन मालमत्ता विकल्या गेल्या नसल्या, तरी इतर दोन मालमत्ता विक्रमी 2 कोटी 3 लाख 29 हजार रुपयांना विकण्यात आल्या. बोली लावणार्यांची नावे जाहीर केलेली नसली, तरी शिवसेना नेते आणि वकील अजय श्रीवास्तव यांनी ही मालमत्ता विकत घेतल्याचे समजते. यापूर्वीही त्यांनी दाऊदची मालमत्ता विकत घेतली आहे.
चार मालमत्तांची एकूण राखीव किंमत 19.2 लाख रुपये होती. यातील पहिली मालमत्ता 10 हजार 420.5 स्क्वेअर मीटर (राखीव किंमत 9 लाख 41 हजार 280 रुपये), दुसरी मालमत्ता 8 हजार 953 स्क्वेअर मीटर (राखीव किंमत 8 लाख 8 हजार 770 रुपये), तिसरी मालमत्ता 170.98 स्क्वेअर मीटर (राखीव किंमत 15 हजार 440 रुपये) आणि चौथी मालमत्ता 1 हजार 730 स्क्वेअर मीटर (राखीव किंमत 1 लाख 56 हजार 270 रुपये) एवढी होती. यातील तिसर्या मालमत्तेला विक्रमी 2 कोटी 1 हजार रुपये एवढी बोली लावण्यात आली; तर चौथ्या मालमत्तेला 3 लाख 28 हजार रुपये एवढी बोली लागली. तिसर्या मालमत्तेसाठी चौघांनी, तर चौथ्या मालमत्तेसाठी तिघांनी बोली लावली. या दोन्ही मालमत्तांची एकूण राखीव किंमत 1 लाख 71 हजार 710 होती. बोली लावणार्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स अॅक्ट किंवा 'सफेमा'च्या प्रशासकांकडून मुंबईत हा लिलाव करण्यात आला. दक्षिण मुंबईतील आयकर भवन येथे लिलाव पार पडला. अर्थ मंत्रालयांतर्गत या प्रशासकांचे काम चालते. गेल्या 9 वर्षांत 'सफेमा' प्रशासनाकडून दाऊदच्या 11 मालमत्तांचा लिलाव करण्यात आला.
2017 मध्ये 'सफेमा' प्रशासनाने दाऊदच्या हॉटेल रौनक अफरोझ, शबनम गेस्ट हाऊस, भेंडी बाजारातील दमारवाला इमारतीतील सहा खोल्या 11 कोटी रुपयांना विकल्या होत्या. दाऊदचा लहान भाऊ इक्बाल कासकर 2017 पर्यंत दमारवाला या इमारतीत राहायचा. त्यानंतर तो नागपाडा येथील गॉर्डन हॉल अपार्टमेंटमधील सदनिकेत राहायला गेला. त्याची बहीण हसीना पारकर हिच्या मालकीची ही सदनिका होती. 2017 मध्ये इक्बालला अटक झाली. सध्या तो तुरुंगात आहे.
दाऊदच्या खेड तालुक्यातील लोटे येथील मालमत्तेचा तीन वर्षांपूर्वी लिलाव करण्यात आला होता. या जागेची राखीव किंमत 61 लाख 48 हजार 100 रुपये होती. स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी सर्वाधिक 1 कोटी 10 लाख रुपये बोली लावून हा लिलाव जिंकला होता.
शिवसेना नेते आणि वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदची खेडमधील मालमत्ता विकत घेतल्याचे समजते. त्यांनी 2001 मध्ये दाऊदच्या मुंबईतील संपत्तीवर बोली लावली होती. त्यात काही दुकानांचा समावेश होता. परंतु, ही संपत्ती कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. 2020 मध्ये श्रीवास्तव यांनी दाऊदच्या रत्नागिरीतील पिढीजात घराची मालकी मिळवली. तेथे सनातन शाळा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले आहे. 1991 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर वानखेडे येथील भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटचे पीच खोदण्यात आले होते. शिवसैनिकांनी हे पीच खोदले होते. या शिवसैनिकांमध्ये श्रीवास्तव यांचा समावेश होता, असे सांगितले जाते.