मुंबई : वृत्तसंस्था
गुजरातने राजस्थानचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. तथापि, या शानदार विजयाचा शिल्पकार ठरलेल्या डेव्हिड मिलरला आयपीएलच्या महालिलावामध्ये खरेदी करण्यात कुणालाही रस नव्हता. पहिल्या फेरीमध्ये मिलर अनसोल्ड राहिला होता.अखेर गुजरात टायटन्सने स्वस्तात मिलरला ताफ्यात घेतले आणि त्याने अक्षरशः चमत्कार घडवला. मिलरने गुजरात संघाचा विश्वास सार्थ ठरवत वादळी खेळी केली. क्वालिफायर वन सामन्यात त्याने गुजरातला विजयपथावर नेलेच; शिवाय त्याआधीही लीग सामन्यात अनेकदा फिनिशरची भूमिका यशस्वी पार पाडली.
क्वालिफायर वन सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवलेल्या मिलरवर दुसर्या फेरीत गुजरात आणि राजस्थान यांच्यामध्ये बोली लागली होती. सोळाव्या फेरीत अखेर गुजरातने मिलरला तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. मिलरची मूळ किंमत होती एक कोटी रुपये.
क्वालिफायर वन सामन्यात राजस्थानविरुद्ध मिलरने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली.
पहिल्या 14 चेंडूंत त्याने फक्त 10 धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढील 24 चेंडूंत मिलरने 58 धावा चोपल्या. या लढतीत त्याने 38 चेंडूंत 68 धावांची खेळी केली. त्यात तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी 16 धावांची गरज असताना मिलरने रुद्रावतार धारण केला आणि प्रसिद्ध कृष्णाला लागोपाठ तीन षटकार ठोकून गुजरातला सामना जिंकून दिला.