भंडारा : पुढारी वृत्तसेवा – घरगुती वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करुन सुनेचा खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी मोहाडी तालुक्यातील रोहणा येथे घडली. पिंकी सतिश ईश्वरकर (वय २५, रा. रोहणा) असे मृत सुनेचे नाव असून बळवंत रघू ईश्वरकर (५५, रा. रोहणा) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. (भंडारा)
माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पिंकीचे पती सतीश हे गावात असलेल्या स्वत:च्या किराणा दुकानात गेले होते. दरम्यान, आरोपी बळवंत सकाळी दूध घेवून घरी आला. तेव्हा पिंकी अंगणात भांडी घासत होती. दरम्यान दोघांमध्ये वाद झाल्याने बळवंतने संतापाच्या भरात कुऱ्हाडीने पिंकीच्या मानेवर जोरदार प्रहार केला. घाव खोलवर गेल्याने पिंकी रक्ताच्या थारोळ्यात पडली. काही क्षणात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर बळवंत स्वत:च मोहाडी पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली.
इकडे बळवंत घटनास्थळावरुन निघून गेल्याने पिंकीचा मृतदेह तिथेच पडून होता. काही वेळाने लहान मुले खेळण्यासाठी गेले असता त्यांना मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसले आणि पिंकीचा मृतदेह भांड्यांवर पडलेला दिसला. तेव्हा त्यांनी ही माहिती पिंकीच्या पतीला दिली.
मोहाडी पोलिसांना सूचना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर पिंकीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर हत्या घरगुती वादातून झाल्याची चर्चा गावात आहे. पिंकीला ३ वर्षाचा मुलगा असून तो आता आईविना पोरका झाला आहे. मोहाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार पुल्लरवार व त्यांची टीम करत आहे.