Latest

2024 च्या विधानसभेला समोरासमोर लढू; दत्तात्रय भरणे यांचे हर्षवर्धन पाटील यांना आव्हान

अमृता चौगुले

वालचंदनगर(ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : विरोधकांना आम्ही केलेली विकासकामे बघवत नसल्याने वारंवार टीका होत आहे. आता 'घोडं आणि मैदान' लांब नाही. सन 2024 च्या विधानसभेला समोरासमोर लढू…..तुम्हाला जनता पुन्हा तुमची जागा दाखवेल.' या भाषेत माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना आव्हान दिले आहे. भरणेवाडी, येथील कार्यक्रमात भरणे बोलत होते. ते म्हणाले, विरोधक आमच्यावर सतत विकासकामांच्या दर्जावरून टक्केवारीचा आरोप करत आहेत.

वास्तविक ज्या ठेकेदारांनी काम खराब केले असेल, त्यांच्यावर रीतसर कारवाई होत असते. मात्र, विरोधकांना आम्ही केलेली कामे बघवत नसल्याने त्यांचा कांगारावळा सुरू आहे. त्यांनी जरा माझे पूर्वीपासूनचे वैभव पाहावे. माझे सात-बारे त्यांना माहीत नाहीत. मात्र, तुम्ही राजकारणात येण्यापूर्वी काय होतात ते जनतेला माहीत आहे. तुमची प्रगती नेमकी कशातून झाली हे जनतेला मी सांगण्याची गरज नाही.

तुम्हाला जनतेने घरी बसवले आहे हे विसरू नका. काही काम नसताना उगाचच मुंबई, दिल्लीच्या वार्‍या करण्यात काय उपयोग, यांच्या सततच्या मागे चिकटून उभा राहण्याला भाजपची नेतेमंडळी वैतागली आहेत. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रशांत पाटील यांनी आपल्या भाषणातून हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली. या वेळी प्रतापराव पाटील, हनुमंत बंडगर, अतुल झगडे, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर आदी उपस्थित होते.

'निरा भीमा'त हाणतात काटा
हर्षवर्धन पाटील चालवत असलेल्या निरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्यात फरक असल्याने गेल्या काही दिवसांत शेतकर्‍यांनी काटा बंद पाडला होता. शेतकर्‍यांच्या घामातून पिकविलेल्या उसाच्या वजनात काटा मारून हे पाप कुठे फेडणार आहात. तुम्ही कारखान्यांच्या कारभारात एवढी टक्केवारी खाल्ली आहे की आता तुमचं पोट फुटायची वेळ आल्याची टीका भरणे यांनी केली.

घरातील 'वॉररूम'मधून खोट्या बातम्या
हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी एक 'वॉररूम' बनवण्यात आली असून, तेथे कारखान्याचे व शिक्षण संस्थेतील कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. याच ठिकाणी बसून खोट्या बातम्या सोशल मीडियावर पसरवण्याचे काम सुरू असून, जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याची टीकाही भरणे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT