Latest

सांगली : शेतकर्‍यांनी द्राक्षे पुरली स्वतःच्याच शेतात

दिनेश चोरगे

लिंगनूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात सलग चार दिवस धुमाकूळ घातलेल्या पावसाने मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, तासगाव व जत या सर्व द्राक्ष पट्ट्यात अक्षरशः कहर केला. द्राक्षघड कुजून, बुरशी येऊन खराब झाले. कवठेमहांकाळ तालुक्यातील बंडगरवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी या भागातील अनेक शेतकर्‍यांनी खराब द्राक्षांचे घड आपल्याच शेतात दोन ओळींच्यामध्ये चरीत पुरले आणि खोरे व ट्रॅक्टरच्या मदतीने मुजवले.

कवठेमहांकाळ तालुक्यातील बंडगरवाडी, शिंदेवाडी या भागातील वीसभर शेतकर्‍यांना हाच मार्ग अवलंबावा लागल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकरी अनिल श्रीपती बोदगिरे (शिंदेवाडी – एच) यांनी दिली. तासगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी ओढ्यात द्राक्षे टाकली. मिरज तालुक्यातील शेतकर्‍यांनी बांधावर, रस्त्यावर टाकली. कुणी द्राक्षे तशीच शेतात सोडली. मिरजपूर्व भागातील सलगरे, चाबुकस्वारवाडी भागात नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. तसेच खटाव, लिंगनूर, मगदूमवाडी भागातही तलाठी व कृषी खात्यामार्फत पंचनामे सुरू केले आहेत.

द्राक्षे खराब झाल्याने दरही पडला

सलगरे येथील बेळंकी रोडवरील एका द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची दीड एकर सुपर सोनाक्का जातीच्या द्राक्षाची बाग पावसाच्या एक दिवस आधी व्यापार्‍यांनी ठरवली होती. 290 रुपये पेटी म्हणजेच चार किलोला हा दर ठरवला होता. अवकाळी पाऊस पडताच दिल्ली मार्केटला क्रॅक द्राक्षे चालत नाहीत, असे कारण सांगून याच द्राक्षांचा दर व्यापार्‍यांनी 75 रुपये पेटी असा केला. पावसाच्या तडाख्यातून वाचलेले घड आणि ज्या घडातील दोन-चार मणी क्रॅक झाले ते काढून उरलेली द्राक्षे नेतो, असे सांगितले आणि उरलेले द्राक्ष घड तसेच सोडून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT