Latest

कोल्हापूर : महिलांनी प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजवावे : वैशाली शैलेंद्र काशीद

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महिलावर्गाने आपले आर्थिक नियोजन करायला शिकले पाहिजे. त्यातून कुटुंबाचे आर्थिक नियोजन होईल. त्यातून राष्ट्र आणि समाज मजबूत होण्यास मदत होईल. म्हणून त्यांनी नवनवीन विषय समजून घेतले पाहिजेत. आपल्या मुलांना ते शिकवले पाहिजे. त्यांनी कालच्यापेक्षा आज अधिक चांगले काम करून प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजवावे, असे प्रतिपादन वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाच्या उपायुक्त वैशाली शैलेंद्र काशीद यांनी केले.

दैनिक 'पुढारी वुमेन्स आयकॉन 2023 अ‍ॅवॉर्ड' वितरण सोहळा येथील हॉटेल रॅमी पंचशीलमध्ये पार पडला. यावेळी काशीद यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत कार्यरत कर्तृत्ववान महिलांना 'वुमेन्स आयकॉन अ‍ॅवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले.

काशीद म्हणाल्या, आपण आयुष्यात नेमके काय करायचे याचे नेटके नियोजन महिलांनी करावे. आपण ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करावेत. आपले आयुष्य मौल्यवान आहे, हे सतत स्वत:ला सांगत राहून त्यांनी सकारात्मक भूमिकेतून जगावे.

दैनिक 'पुढारी'चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर प्रास्ताविकात म्हणाले, माध्यम म्हणून समाजात काम करत असताना, समाजाच्या सर्व स्तरांतील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे ही आपली जबाबदारी समजून दै. 'पुढारी'ने हा उपक्रम हाती घेतला आहे. आज विविध क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. त्यातील सर्वांचाच गौरव एका कार्यक्रमात करणे शक्य नाही. त्यामुळे यापुढील काळातही असे उपक्रम घेऊन विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान करण्याची दै. 'पुढारी'ची भूमिका राहील.

यावेळी विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, वरिष्ठ इव्हेंट व्यवस्थापक राहुल शिंगणापूरकर, जाहिरात व्यवस्थापक (शहर) अतुल एकशिंगे, जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) जावेद शेख, सहायक जाहिरात व्यवस्थापक रिया भांदिगरे, टोमॅटो एफएमचे जाहिरात व्यवस्थापक मयूर तांबेकर तसेच जाहिरात प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी डीकेएएसी महाविद्यालय इचलकरंजीच्या प्रभावती अरविंद पाटील, स्वराज्य महिला संस्था कोल्हापूरच्या नेहा तेंडुलकर, प्रयोदी सोशल फाऊंडेशनच्या योगिता कोडोलीकर, मातोश्री होमिओपॅथीच्या पूजा चोपडे-पाटील, आर्च कॉस्मोटेकच्या रेखा प्रदीप सारडा, गो ग्रो मोअरच्या डायरेक्टर रीटा सोनवणे, इनरव्हील क्लब, कोल्हापूरच्या विद्या धनंजय पठाडे, शहीद शिक्षण प्रसारक मंडळ तिटवे (ता. राधानगरी) येथील वीरपत्नी लक्ष्मीबाई सीताराम पाटील, डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट, जयसिंगपूरच्या सोनाली विजयराज मगदूम, केअर हॉस्पीटल, कोरोचीच्या शुभांगी प्रदीप पाटील, प्रांत ग्राहक सर्वेक्षण परिषदेच्या हसिना शेख व बामणी येथील अ‍ॅडव्होकेट (नोटरी) नीता शिवाजीराव मगदूम यांना यावेळी दैनिक 'पुढारी' आयोजित 'वुमेन्स आयकॉन अ‍ॅवॉर्ड' प्रदान करण्यात आले.

'पुढारी'ने घेतली कर्तृत्ववान महिलांची दखल

आज महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत; पण त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना समाजाने प्रोत्साहित करण्याची गरज असते. ती गरज 'पुढारी'च्या या कार्यक्रमातून पूर्ण झाली, अशा शब्दात आयकॉन अ‍ॅवॉर्ड विजेत्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अ‍ॅवॉर्ड विजेत्या महिलांनी आपले अनुभव सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT