Latest

उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’चे वलय घालवले : दादा भुसे यांची टीका

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एकेकाळी लोक स्वत: मातोश्रीवर यायचे आणि न्याय मागायचे. मातोश्रीचे एवढे वलय होते की, देशातीलच नव्हे तर,विदेशातील लोकही मातोश्रीवर यायचे यायचे. परंतु, उद्धव ठाकरेनी मातोश्रीचे वलय घालवले आहे. आता त्यांनाच दुसरीकडे जाऊन आपली भूमिका मांडावी लागते, अशी खोचक टीका पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. ठाकरे गटातील नेत्यांसह जितेंद्र आव्हाड यांच्याकडून न्याय व्यवस्थेविषयी उपस्थित केले जाणारे प्रश्न लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका करत सर्वोच्च न्यायालयावर टिका करणारे स्वत:ला 'सर्वोच्च' समजता का, असा सवालही भुसेंनी उपस्थित केला आहे.

शिंदे गटाच्या युवा सेनेतर्फे आयोजित युवा संवाद मेळाव्यासाठी पालकमंत्री भुसे बुधवारी नाशिकमध्ये आले होते. या मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उध्दव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेवर भुसे यांनी टीका केली. भुसे म्हणाले की, आपला देश संविधान आणि कायद्यानुसार चालतो. आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर जी कागदपत्रे सादर झाली. त्यानुसार त्यांनी न्यायनिवाडा दिला. परंतु, काही लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. महापत्रकार परिषदेत वकिलांनीही राजकीय भाषणे केली. त्यामुळे ती महापत्रकार परिषद नव्हे तर, राजकीय पक्षांचा मेळावा किंवा सभा होती, असा टोलाही भुसेंनी लगावला आहे. शिवसेना ठाकरे गटाने निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मग ही स्टंटबाजी नाही का, असा सवालही भुसेंनी केला आहे.

ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली आहे. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केल्याचा दावाही भुसेंनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी महायुतीतील मित्र पक्षांचे मेळावे प्रत्येक जिल्ह्यात झालेत. त्याला अनुसरूनच प्रत्येक जिल्ह्यात युवासेनेचेही मेळावे घेतले जात आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मेळावे घेतले जात असल्याची माहिती भुसेंनी यावेळी दिली.

आव्हाडांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही

आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरेंपाठोपाठ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली आहे. त्यास भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाड यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या आधीही त्यांनी श्रीरामांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे आव्हाड यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला भुसे यांनी लगावला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT