प्राग : 'पैशांचे झाड', 'पैशांचा पाऊस' असे शब्द आपण केवळ लक्ष्यार्थाने वापरत असतो, त्यांचा शब्दशः किंवा वाच्यार्थ घ्यायचा नसतो. मात्र झेक प्रजासत्ताक या देशात नुकताच अक्षरशः 'पैशांचा पाऊस' पडला. अर्थात हा खरा पाऊस नव्हता, पण एका व्यक्तीने हेलिकॉप्टरमधून नोटा खाली उधळल्या. आकाशातून अशा नोटा पडत असल्याने अनेक लोक या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी धावले!
इन्फ्लुएंसर आणि टीव्ही होस्ट कामिल बार्टोशेकने हेलिकॉप्टरमधून हा पैशांचा पाऊस पाडला. त्याने लिसा नाड लबेम शहराजवळ हेलिकॉप्टरमधून दहा लाख डॉलर्स उधळले. त्याची सुरुवात झाली एका कोड्यापासून. कामिल त्याच्या 'वन मॅन शो : द मुव्ही' या चित्रपटातील कोडे सोडवणार्या विजेत्याला दहा लाख रुपये देणार होता. मात्र हे कोडे कुणालाच सोडवता आले नाही. कामिलने स्पर्धेसाठी साईन अप केलेल्या सर्व स्पर्धकांमध्ये हे पैसे वितरित करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या रविवारी सकाळी सहा वाजता त्याने एक ईमेल पाठवला, ज्यामध्ये हे पैसे कुठे उधळले जाणार आहेत याची गुप्त माहिती देण्यात आली. त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी स्पर्धेत अर्ज करणारे लोक गोळा झाले. कामिलनेही आपला शब्द पाळला आणि हेलिकॉप्टरमधून हे पैसे उधळले. त्याने या घटनेचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. आकाशातून डॉलर्सचा वर्षाव होताच शेकडो लोकांनी या नोटा गोळा करण्यासाठी धाव घेतली. तासाभरातच या सर्व नोटा लोकांनी गोळा केल्या.