Latest

समस्या ‘सीव्हीआय’ची, काय आहे कारण?

Arun Patil

पायांवर पडणार्‍या काळ्या डागांकडे त्वचेसंबंधीची समस्या समजून दुर्लक्ष केले जाते; पण असे करणे नक्कीच चांगले नाही. पायाच्या नसांसंबंधातील ही गंभीर समस्या असू शकते. त्याला 'क्रॉनिक वेन्स इन्सफिशियन्सी' किंवा 'सीव्हीआय' (CVI) म्हटले जाते.

पायाच्या खालच्या बाजूला काळ्या रंगाचे चट्टे असतील, पायांचा रंग शरीराच्या तुलनेत जास्त गडद असेल तसेच एका तासाच्या वर उभे राहिल्यास त्रास होत असेल, चालल्यानंतर पायाला सूज येत असेल तसेच थोडे चालल्यावर पायावर ताण किंवा खूप जास्त थकल्यासारखे होत असेल तर या सर्वांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये. कारण पायाच्या नसेसंबधी गभीर समस्या असू शकते. त्यालाच वैद्यकीय भाषेत 'क्रोनिक व्हेन्स इन्सफिसियन्शी' म्हणजेच 'सीवीआय' म्हणतात.

स्त्रियांना जाणवू शकते समस्या 

हा आजार कोणालाही होऊ शकतो मात्र 30 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या स्त्रियांमध्ये सीवीआयची समस्या पाहायला मिळते. बहुतांश वेळा गर्भावस्थेदरम्यान किंवा प्रसूतीनंतर याची लक्षणे दिसून येतात, पण या समस्येवर कोणताही ठोस उपाय मिळत नाही.

जीवनशैलीचा परिणाम 

आधुनिक जीवनशैलीचा परिणाम म्हणून 'सीवीसी'ची समस्या वेगाने वाढते आहे. तंत्रज्ञानावरील वाढते अवलंबित्वामुळे हल्ली शारीरिक हालचाली दिवसेंदिवस कमी होत आहेत. बैठ्या कामात गुंतलेल्या लोकांना हा आजार होण्याची शंका वाढते. त्याशिवाय ट्रॅफिक पोलिस, शेफ आणि ब्युटी सलूनमध्ये काम करणार्‍या लोकांनाही ही समस्या होऊ शकते. कारण या सर्व लोकांचे काम उभ्यानेच असते. त्यामुळे अशुद्ध रक्क फुफ्फुसाकडे न जाता पायांच्या नसांमध्ये साठू लागते. त्यामुळेचे पायावर काळे डाग पडतात.

असे का घडते?

शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे पायालाही ऑक्सिजनची गरज भासते. हृदयाच्या धमन्यांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम शुद्ध रक्तामुळे होते. पायांना ऑक्सिजन दिल्यानंतर ऑक्सिजनविरहीत अशुद्ध रक्त वाहिन्यांच्या मदतीने पुन्हा पायापासून फुफ्फुसांकडे शुद्धीकरणासाठी पाठवले जाते. याचा अर्थ पायाच्या या नसा ड्रेनेज सिस्टिम आहेत. एखाद्या कारणाने ही कार्यप्रणाली शिथिल होते आणि पायांच्या ड्रेनज सिस्टिमवर त्याचा परिणाम होतो. एखाद्या कारणामुळे ही कार्यप्रणाली घटली तर पायांच्या ड्रेनेज सिस्टिमवर परिणाम होतो. मग ऑक्सिजन विरहित अशुद्ध रक्त वर चढूनफुफ्फुसाकडे जाण्याऐवजी पायाच्या खालच्या बाजूला जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळेच पायावर सूज आणि काळे डाग पडण्याची समस्या निर्माण होते. वेळीच या समस्येवर इलाज केला नाही तर हे काळे डाग गहिरे होतात आणि मग त्याचे जखमेत रूपांतर होते.

ज्या लोकांना डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणजेच डीवीटीची समस्या असते त्यांच्या पायातील नसांमध्ये रक्त जमा होते. त्याचा परिणाम म्हणजे
शिरांमुळे अशुद्ध रक्त वर चढण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. शेवटी त्याचे रूपांतर 'सीवीआय'मध्ये होते. व्यायामाचा अभाव हे देखील या समस्येचे प्रमुख कारण आहे. शारीरिक निष्क्रियतेमध्ये पायातील स्नायूंमधील अशुद्ध रक्त वरती चढवणारा पंप कमजोर होतो. काही लोकांच्या नसांमध्ये असलेला व्हॉल्व्हचा जन्मजात विकास झालेला नसतो अशा रुग्णांध्ये 'सीवीआय'ची लक्षणे कमी वयातच दिसून येतात.

उपचार कोणते? 

पायावर काळे डाग दिसत असतील तर हा त्वचा रोग आहे असे समजून गप्पा राहू नका. अशा परिस्थितीत एखाद्या व्हॅस्क्युलर सर्जनचा सल्ला घ्या. उपचारांदरम्यान सर्वप्रथम या डागांच्या खर्‍या कारणांविषयी जाणून घ्या. त्यासाठी व्हेन डॉपलर स्टडी, एम. आर., वेनोग्राम या सारख्या चाचण्या आणि काही वेळा अँजिओग्राफी देखील करता येऊ शकते. रक्ताची विशेष तपासणी करून रक्ताची गुठळी होण्याच्या प्रक्रियेत काही दोष तर नाहीत ना हे जाणून घेतले जाते. या विशेष चाचण्यांच्या आधारावर सीवीआय चा उपचार योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे.

अनेकदा रुग्णांना औषधे आणि विशेष व्यायाम करण्याची गरज असते. गंभीर परिस्थितीत शस्त्रक्रियाही करावी लागते. व्हेन वाल्वुलोप्लास्टी, एक्झेलरी व्हेन ट्रान्सफर किंवा वेन्स बायपास सर्जरीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आजारावर उपचार करणे शक्य होते. वेन बायपास शस्त्रक्रिया हल्ली लोकप्रिय झाली. त्यासाठी काही वेळा परदेशांतून आयात केलेल्या कृत्रिम नसांचा वापर केला जातो. काही वेळा इन्डोस्कोपिक व्हेन सर्जरी किंवा लेसर सर्जरीची मदत घ्यावी लागते.

सजगता बाळगल्यास या समस्येचे नियंत्रण करणे सोपे जाऊ शकते. अर्थात थोडे बरे वाटते आहे म्हणून उपचार अर्धवट सोडू नयेत एखाद्या व्यक्तीला ही समस्या झाली असेल आणि तो बराही झाला असेल तरीही वर्षातून एकदा तपासणी जरूर करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT