Latest

सिरियल किलर्स एकापाठोपाठ एक खून का करतात? काय असतात कारणे

Arun Patil

आम्ही पुण्यात रहात असताना एक थरार लहानपणी अनुभवला होता. संध्याकाळी 7 नंतर रस्ते ओस आणि भीतीचे तुफान, संपूर्ण पुण्यात पसरलेले! कारण, राजेंद्र जक्कल, दिलिप सुतार, शांताराम जगताप, मुन्व्वर शहा या कला महाविद्यालयात शिकणार्‍या चौकडीने जानेवारी 1976 ते मार्च 1977 या पंधरा महिन्यात लगातार केलेले दहा खून! हे होते जोशी-अभ्यंकर खून प्रकरण म्हणजे सिरियल किलिंग! तीन पेक्षा जास्त व्यक्तींचा खून करणार्‍या गुन्हेगाराला 'सिरीयल किलर' असे म्हणतात! म्हणजे तो एकापाठोपाठ एक खून करत सुटलेला असतो.

हजारो वर्षांचा इतिहास!

फार पूर्वी म्हणजे 1849 मध्ये जोहनी नावाच्या गुन्हेगाराने पाच आठवड्यात बारा खून केलेले होते. हान वंशातल्या झिंग नावाच्या चिनी राजाचा पुतण्या लिऊ पेंगली याने जवळपास 100 जणांचा खून इसवी सनापुर्वी 144 मध्ये केलेला होता. फ्रान्समध्ये जोन ऑफ आर्क च्या सैन्यातील एक नेता गिलेस रईसने शंभर च्या वर लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करून खून केले होते. 1889 मध्ये लंडनच्या व्हाईट चॅपेल जिल्ह्यामध्ये जॅक द रिपर नावाच्या कुविख्यात सिरीयल किलरने, जो शेवटपर्यंत सापडला नाही, त्याने पाच पेक्षा अधिक स्त्रियांचा खून केला आणि तो आधुनिक काळातला पहिला सिरीयल किलर समजला जातो. भारतात ठग नावाने जी टोळी अस्तित्वात होती ती या कारवाया करत असे.

मास्क ऑफ सनिटी!

जगभरातल्या सर्व देशांमध्ये क्रमाने खून करणार्‍या केसेस घडल्या आहेत. त्यातून असे दिसून येते की या गुन्हेगारांच्या विशिष्ट सवयी आणि स्वभाव असतात. त्यांना विविध प्रकारचे मानसिक रोग असू शकतात. त्यांना काहीतरी सणसणाटी सतत हवे असते. त्यांच्या मनात पश्चाताप किंवा अपराधीपणाचा मागमूस देखील नसतो. सणकीपणा किंवा अचानक हल्ला करण्याची वृत्ती ही मनात दबून असते. वरून ते शहाणपणाचा मुखवटा घेऊन वावरतात, ज्याला 'मास्क ऑफ सनिटी' असे म्हटले जाते. घरातल्याच कुठल्यातरी व्यक्तीकडून त्यांचा शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक छळ झालेला असतो. त्यांच्यात अनेक लैंगिक दुर्व्यवहार आढळतात. म्हणजे शरीराचे लैंगिक अवयव सोडून कुठल्यातरी इतर एका भागा विषयी किंवा कुठल्यातरी वस्तू विषयी लैंगिक आकर्षण वाटून संबंध ठेवण्याची इच्छा होते. याला पारशीयालिझम व फेटिशिजम असे म्हणतात. मेलेल्या व्यक्तीच्या मढ्याबरोबर सेक्स करावासा वाटणे ज्याला निक्रोफिलिया म्हणतात अशी ही विकृत भावना असते. त्यांना नेहमी लहानपणी धमक्या किंवा समाजापासून वेगळे ठेवण्याचे अनुभव असतात. फ्रॉड करणे, चोर्‍या करणे, दंगे माजवणे, असले गुन्हे करण्याचा त्यांना अनुभव असतो. यांची बुद्धिमत्ता अतिशय सामान्य किंवा त्याही खालची असते.
काही सिरीयल किलर्स हे फॅन्टॅस्टिक कल्पनांमध्ये गुंतलेले असतात. आणि त्या कल्पना अवस्थेतच ते खून करत सुटतात. जेन टोप्पन ही नर्स पेशंटला मरायचे औषध द्यायची आणि तो मरणाच्या वाटेवर चालला की त्याला कुशीत घेऊन झोपायची कारण तीची लैंगिक इच्छा त्याने पूर्ण व्हायची!

मिशन ओरिएंटेड किलर्स!

साधारणपणे क्रमाने खून करण्याची इच्छा निर्माण होण्यामागे चार कारणे असतात. एक म्हणजे वास्तवाचा पूर्णपणे अभाव त्यांच्या विचारांमध्ये असतो. कल्पना विश्वात ते वावरत असतात आणि एक तर देवाने किंवा सैतानाने त्यांना आदेश दिलेला आहे म्हणून ते हे कृत्य करतात. यांना 'व्हिजनरी सिरीयल किलर' म्हणतात. दुसर्‍या प्रकारात विशिष्ट ध्येय आणि धोरण पूर्ण करण्यासाठी माणसे मारत ते सुटलेले असतात. उदाहरणार्थ, त्यांच्या दृष्टिकोनातून दुसर्‍या धर्माचे लोक हे मारून टाकणे योग्य आहे, अशी विकृत मानसिकता त्यांच्या डोक्यात असते किंवा वेश्या, व्यसनाला लावणारे धंदेवाईक, बेघर आणि गरीब, समलिंग संभोगी वगैरे लोक हे समाजाला धब्बा आहेत असे त्यांना वाटते. म्हणून त्यांना मारून टाकण्याचे सत्र ते अवलंबतात. यांना 'मिशन ओरिएंटेड सिरीयल किलर्स' म्हणतात. थ्रील, वासना किंवा 'आत्मा शांत होणे' हे तिसरे कारण आहे. चौथे कारण आहे आपण सर्वशक्तिमान असून आपल्या नियंत्रणात सर्वांनी राहायला पाहिजे अशी मानसिकता. वास्तवात या सर्व कारणांमध्ये शासन, समाज आणि आरोग्य यंत्रणा यांचे सक्षमीकरण करणे हा उपाय असू शकतो. त्यांना शिक्षा देऊन मारून टाकणे हा उपाय सध्या चालूच आहे. परंतु जर या यंत्रणा सुधारल्या तर सिरीयल किलर्स निर्माण होण्याची शक्यता खूपच कमी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT