दक्षता; राकेश माने
Credit Card : एखाद्याच्या क्रेडिट कार्डचा वापर अधिक असेल तर काही कंपन्या त्याच्या शुल्कात सवलतही देतात. आपल्याला एखादा कार्डचा ब्रँड आवडत असेल तर क्रेडिट कार्ड घेताना त्याचा निश्चित विचार करायला हवा. क्रेडिट कार्डची निवड करताना खर्चाच्या सवयीचेही आकलन करायला हवे.
सध्याच्या काळात क्रेडिट कार्ड हे आर्थिक व्यवहारासाठी सर्वात सुलभ आणि सोयीचे माध्यम आहे. क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. क्रेडिट कार्ड ही एकप्रकारे बँकेकडून दिली जाणारी क्रेडिट फॅसिलिटी आहे. यानुसार बँक ग्राहकाला काही अटी आणि नियमांच्या आधारे प्री अप्रूव्हड क्रेडिट कार्ड जारी करते. यासाठी उत्पन्न, क्रेडिट स्कोर लक्षात घेतला जातो. पहिल्या वर्षी क्रेडिट कार्डवर शुल्क आकारले जात नाही. मात्र दुसर्या वर्षापासून कार्डावर नियमित वार्षिक शुल्क आकारणी केली जाते. क्रेडिट कार्डचा वापर अधिक असेल तर काही कंपन्या शुल्कात सवलतही देतात. आपल्याला एखादा ब्रँड आवडत असेल तर क्रेडिट कार्ड घेताना त्याचा विचार करायला हवा. क्रेडिट कार्डची निवड करताना खर्चाच्या सवयीचेही आकलन करायला हवे.
बँकेची अनेक प्रकारची क्रेडिट कार्डस् असतात. आपण गरजेनुसार निवड करू शकता. साधारणपणे क्रेडिट कार्ड सात प्रकारचे असतात. यात शॉपिंग क्रेडिट कार्ड, ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड, फ्यूअल क्रेडिट कार्ड, रिवार्ड क्रेडिट कार्ड, एंटरटेन्मेंट क्रेडिट कार्ड, लाईफटाइम फ्री क्रेडिट कार्ड आणि को ब्रँडेड क्रेडिट कार्ड आदींचा यात समावेश असतो.
क्रेडिट कार्ड घेण्यासाठी किमान वय 18 तर कमाल वय 60 असणे गरजेचे आहे. आपले मासिक वेतन किमान 20 हजार रुपये असायला हवे. सेल्फ इम्प्लॉईड पर्सनचे उत्पन्न हे वार्षिक तीन लाख रुपये असायला हवे. क्रेडिट स्कोर 700 किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवा. क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आयडी प्रुफ, स्वाक्षरीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, पॅन कार्ड, वाहन परवाना, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र असणे आवश्यक आहे. रहिवासी पुराव्यासाठी बँक स्टेटमेंट, रेंट अॅग्रीमेंट, व्होटर आयडी, रेशनकार्ड, पासपोर्ट, टेलिफोन, वीज किंवा पाण्याचे बिल यापैकी कोणतेही एक डॉक्यूमेंट असणे आवश्यक आहे. उत्पन्नाच्या पुराव्यासाठी सॅलरी स्लिप किंवा सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट देता येऊ शकते.