कर्जत; पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीतील यशावरून राष्ट्रवादी काँग्रेसच आमदार रोहित पवार व भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात श्रेयवाद सुरू झाला आहे. त्यावरून एकमेकांवर प्रखर टीका केली जात आहे. आमदार पवार व आमदार शिंदे यांच्यात मतदारसंघातील प्रत्येक निवडणुकीत मोठी चुरस असते. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर आमदार शिंदे यांनी भाजपला मोठे यश मिळाल्याचा दावा केला, तर आमदार पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाल्याचे सांगितले. निकालानंतर विजयी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करताना आमदार शिंदे व आमदार पवार यांनी एकमेकांवर प्रखर टीका केली.
आमदार पवार म्हणाले की, कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत चांगली यश मिळाले. मात्र, काहीजण हवेत आहेत. त्यांना हवेतच राहू द्या. हवेत असणारे सहसा जमिनीवर येत नाहीत. ते पाठीमागच्या दाराने आलेले आहेत. त्यामुळे त्यांची फारशी दखल घेण्याची गरज नाही. आमदार पवार एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनीे कुणी काहीही केले तरी मतदारसंघांमध्ये विकासकामे सुरू राहतील. त्यांना मी स्थगिती मिळू देणार नाही. विरोधक दबावाचे राजकारण करीत आहेत. मात्र, तो दबाव राहणार नाही. दबावाऐवजी विकासाचे राजकारण करत आहे. आणि करत राहणार, असे ठणकावून सांगितले.
आमदार शिंदे यांनीही ग्रामपंचायत निवडणुकांत भाजपला मोठे यश मिळाल्याचा दावा केला आहे. यापूर्वीच्या पहिल्या टप्प्यात देखील कोरेगाव, बजरंगवाडी व कुळधरण येथे भाजपने बाजी मारली होती. आमच्या विजयी सरपंच आणि उमेदवारांंना बोलावून आमदार पवार यांनी त्यांचा सत्कार केला. मात्र, त्यांनी मान्य करायला हवे होते की भाजपने बाजी मारली आहे. आम्ही फक्त आमचेच विजयी सरपंच आणि सदस्य बोलावले. निवडणुकीत त्रास द्यायचा आणि नंतर निवडून आल्यावर त्यांचा सत्कार करायचा ही पद्धत योग्य नाही, असा टोला आमदार पवार यांना लगावला.
अडीच वर्षांत जनतेने फेसबुक, व्हॉटस्अॅप, सेलिब्रिटी सर्व पाहिले आहे. आता शाळा-कॉलेजमध्ये कार्यक्रम घेण्याची वेळ आली. आणि आता निवडणूक निकालाने त्यांना विकास कसा नसतो, याचे उत्तर मिळाले आहे. कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी मी आमदार नव्हतो. मात्र, आता मी आमदार झालो आहे. राज्यातही आमची सत्ता आहे. त्यामुळे यापुढे दबावाचे राजकारण चालू देणार नाही, असेही आमदार शिंदे यांनी आमदार पवारांना सुनावले.
आगामी निवडणुकांत मोठी चुरस
आमदारद्वयींच्या आरोप-प्रत्यारोपामुळे मतदारसंघांमध्ये आगामी काळात होत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहावयास मिळणार आहे.