Latest

पुणे : खोकला, ताप जाता जाईना; नागरिक हैराण, आजाराकडे दुर्लक्ष न करण्याचा डॉक्टरांचा सल्ल्ला

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हिवाळ्यात यंदा वातावरणात अनपेक्षित बदल पहायला मिळत आहेत. कोरडा खोकला, घशातील खवखव यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. एरव्ही औषधोपचार आणि घरगुती उपायांनी दोन-चार दिवसांत बरा होणारा खोकला आठ-दहा दिवस झाले तरी ठाण मांडून बसला असल्याच्या तक्रारी रुग्ण डॉक्टरांकडे घेऊन येत आहेत.

हवेतील गारठा, धूळ, मातीचे कण, प्रदूषण, आहारातील बदल अशा अनेक कारणांमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप अशा त्रासांचा समावेश असतो. यंदा कोरड्या खोकल्याची समस्या जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे जुलाब आणि उलट्यासारख्या समस्यांनीही रुग्णांना हैराण केले आहे.

सध्या पुण्यात कोरडा खोकला, सर्दी, विषाणूजन्य ताप आणि उलट्या या प्रमुख तक्रारी असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ही रुग्णसंख्या वाढत आहे. बदलत्या हवामानामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या आजारांचीही प्रकरणे समोर येत आहेत.

कोरड्या हवेमुळे अस्थमाचा अधिक त्रास
हिवाळा अस्थमा रुग्णांसाठी आव्हानात्मक असतो. थंड वारे, कोरडी हवा यामुळे श्वसनमार्गावर परिणाम होताना दिसतो. थंडी वाढू लागते त्या वेळी वातावरणातील मोल्ड्स, दमटपणा आणि डस्टमाईट्समध्ये वाढ होते, त्याचबरोबर छातीतील इन्फेक्शन्स आणि फ्लूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावते. थंड हवेमुळे अधिक प्रमाणात अस्थमा वाढण्याची शक्यता असते. परिणामी, खोकला (ओला किंवा सुका खोकला), छाती भरणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या गोष्टी घडत असतात. त्याबाबत बोलताना पल्मोनोलॉजिस्ट डॉ. महावीर बागरेचा म्हणाले, "अस्थमा आणि ट्रिगर्स यांमध्ये होणारा बदलही डॉक्टरांना कळवणे आवश्यक असते. बचावात्मक औषधे गरजेनुसार दिली जातात, ज्यामध्ये विशेष करून वेगाने परिणाम होऊन नावाप्रमाणेच वेगाने होणारा आजार कमी केला जाऊ शकेल. दुसरीकडे देखभालीची औषधे म्हणजे रोज औषधे देऊन अचानक उद्भवणारा त्रास कमी करण्यावर भर दिला जातो, म्हणूनच अस्थमाच्या लोकांमध्ये ही उपचार पद्धती महत्त्वपूर्ण असते.'

काय काळजी घ्यावी?

  • संतुलित आहाराचे सेवन आणि भरपूर पाणी प्यावे.
  • पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप सतत येत असेल, खोकला असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • आजाराचे वेळीच निदान आणि उपचार केल्यास रुग्ण बरा होऊ शकतो.
  • ऋतू बदलत असताना असे संक्रमण सामान्य असले तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका.

ऋतू बदलत असताना विशेषत: विषाणूजन्य संसर्गामध्ये वाढ होते. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा सर्दी, खोकला, अपचन, तापाचे रुग्ण अधिक प्रमाणात उपचारांसाठी येत आहेत. सर्दी, ताप आणि खोकला अधिक दिवस राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. हिवाळ्यात नागरिकांनी काळजी न घेतल्यास संसर्गजन्य आजार वाढू शकतात.
                                               डॉ. सम्राट शहा, जनरल मेडिसीन

आजारी व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा कोरड्या हवेत संसर्गजन्य श्वसनाचे थेंब अधिक जलदगतीने प्रवास करतात. लोक सामान्यतः थंड हवामानात (विशेषत: सुट्टीच्या आसपास) घरामध्ये एकत्र जमतात, फिरायला जातात. त्यामुळे आजार एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीकडे लवकर पसरतो. हिवाळ्यातील आजाराची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत.

                                                डॉ. जगदीश काथवटे, बालरोगतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT