file photo 
Latest

कर्नाटकात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती, बंगळुरात सापडला नवा विषाणू

मोनिका क्षीरसागर

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाचा नवा विषाणू बंगळुरात सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण कर्नाटकात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्‍त करण्यात आली आहे. पण, याविषयी तूर्तास भीती बाळगण्याचे कारण नसल्याचा दिलासा तज्ज्ञांनी दिला आहे. ओमायक्रॉनचा नवा विषाणू बए-2 शी संबंधित सार्स को आणि बीए-2.10 व बीए-2.12 नवे विषाणू सापडले आहेत. या विषाणूंचा संसर्ग वेगाने होतो की नाही, याचा परिणाम तीव्र असेल की नाही? याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी कोणतेही पुरावे अजून उपलब्ध झालेले नाहीत. राज्य जिनोमिक संशोधन केंद्राने याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.

1 मार्च रोजी बीए-10 आणि बीए-12 हे दोन नवे विषाणू बंगळुरात आढळले होते. सध्या बंगळुरातील कोरोनाचा संसर्ग 3 टक्के आहे. राज्यातील संसर्गाचे प्रमाण 1 टक्का आहे. आरोग्य खात्याचे आयुक्त डी. रणदीप यांनी 1 मार्चपासून 714 जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आल्याचे कळवले आहे. त्यापैकी 524 चाचण्यांच्या अहवालात बीए 2 ओमायक्रॉन विषाणू आढळला. दिल्लीमध्ये ए 2.12.1 प्रकारचा विषाणू आढळला असून कर्नाटकात तो आढळला नसल्याचे रणदीप यांनी स्पष्ट केले आहे.

खबरदारी घेणे गरजेचे

बंगळुरात कोरोनाचा नवा विषाणू सापडला तरी याविषयी घाबरू नये. कोरोनाची चौथी लाट राज्यात सुरु झालेली नाही. तरीही याविषयी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केले आहे. आणखी आठवडाभर कोरोना रुग्णांच्या चाचणी अहवालाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर संसर्ग वाढण्यामागील कारण स्पष्ट होणार आहे. याआधीच्या कोरोना लाटांप्रमाणेच यावेळीही सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोरोना मार्गसूची 27 नंतर : बोम्मई

देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग सुरु झाला आहे. ही चौथी लाट रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर नवी मार्गसूची जारी केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

येथे ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाची चौथी लाट थोपवण्यासाठी सरकारने तयारी केली आहे. लसीकरणावर भर देण्यात आला आहे. 27 रोजी होणार्‍या कॉन्फरन्समध्ये मार्गसूचीबाबत चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर अंतिम मार्गसूची जारी केली जाईल. मास्कची सक्ती, गर्दीवर नियंत्रण आदींसह काही कठोर नियम केले जाणार आहेत. पंतप्रधानांच्या बैठकीनंतर राज्यामध्ये आवश्यक मार्गसूची जारी केली जाईल. प्रत्येकाला मार्गसूचीचे पालन करावे लागेल.

दंगलीची कसून चौकशी

हुबळीतील दंगल सामान्य नव्हती. यामागे काही संघटना आणि व्यक्तींचा हात असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत दिसून आले आहे. प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. काही दिवसांतच या षडयंत्राबाबत आवश्यक माहिती मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला. के. जी. हळ्ळी, डी. जे. हळ्ळी येथील दंगलीवेळी केलेल्या कारवाईप्रमाणेच हुबळी दंगलीतील संशयितांवर कारवाई केली जाणार असल्याचे बोम्मई यांनी
सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT