Latest

शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेस-ठाकरे गटात खडाजंगी

Arun Patil

मुंबई : महाविकास आघाडीत जागावाटपावरून चर्चा सुरळीत सुरू असताना शिवसेनेच्या आणि संजय राऊत यांच्या भूमिकेमुळे या चर्चेत मिठाचा खडा पडला आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात खडाजंगी उडाली. आता शिवसेनेसोबत आम्ही चर्चा करणार नाही, असा आक्रमक पवित्रा राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला आहे. यापुढे दिल्लीतील नेत्यांनीच शिवसेनेसोबत चर्चा करावी, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार नाही, असे प्रदेश काँग्रेसने राष्ट्रीय अध्यक्षांना कळविल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरा महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेनेच्या वतीने संजय राऊत उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेस नेते आणि संजय राऊत यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाली. काँग्रेसला विश्वासात न घेता सांगली मतदारसंघात शिवसेनेने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे काँग्रेसचे नेते संतापले आहेत. संजय राऊत यांची भूमिका आणि त्यांची वक्तव्ये, यामुळे काँग्रेस पक्ष संतप्त झाला आहे.

महाविकास आघाडीत दोन-तीन जागा वगळता अन्य जागांवर एकमत झाले आहे. मात्र, सांगली, भिवंडी आणि वर्धा या जागांवर वाद आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परस्पर सांगलीत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. शहरात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. एकही आमदार शिवसेनेचा नाही. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे, अशी तेथील काँग्रेसची जोरदार मागणी आहे. काँग्रेसचे विशाल पाटील हे तेथून इच्छुक आहेत. असे असताना उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषित केल्याने काँग्रेसमध्ये संताप आहे.

पवारांची मध्यस्थी

2019 मध्ये जिंकलेल्या आणि लढविलेल्या सर्व जागा शिवसेनेला हव्या आहेत, असे बैठकीत राऊत यांनी सांगितले. त्यामुळे बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस नेते भडकले. तुम्हीच सर्व जागा लढवा, असा निर्वाणीचा इशाराच नेत्यांनी त्यांना दिला. तेव्हा आमच्या पक्षाची या जागांवर ताकद आहे, असा पवित्रा घेत राऊत यांनी वाद घातल्याचे कळते. त्यामुळे वाद आणखी चिघळला. तेव्हा शरद पवार यांनी मध्यस्थी केली.

शिवसेनेची सुरुवातीपासूनच जादा जागांची मागणी

महाविकास आघाडीतील जागावाटपासाठी पहिल्यांदा दिल्लीत बैठक झाली, तेव्हा शिवसेनेतर्फे सहभागी झालेल्या राऊत यांनी 30 जागांची मागणी केली. यामुळे संतापलेल्या काँग्रेस नेत्यांनी तुम्ही सर्व जागांवर लढा, आम्ही बाहेरून पाठिंबा देतो, असे सुनावले होते.

शिवसेनेच्या अवास्तव जादा जागांच्या मागणीमुळे जागावाटपावर निर्णय होत नाही, अशी राज्यातील काँग्रेस नेत्यांची तक्रार आहे. गेल्या आठवड्यात तर शिवसेना 23 जागांवर अडून बसली होती. महाविकास आघाडीच्या चर्चेत राऊत अधिकाधिक जागांवर दावा करतात; मात्र तडजोडीला तयार नसतात, अशी तक्रारच या बैठकीत व नंतर पक्षाध्यक्ष खर्गेंकडे करण्यात आली आहे.

आता काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनीच शिवसेनेशी चर्चा करावी, आम्ही चर्चा करणार नाही, अशी ठाम भूमिका बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीतच मांडली. शिवसेना ज्या पद्धतीने जागांची मागणी करतेय ते पाहता शिवसेनेत आणि 'वंचित'मध्ये काय फरक आहे, असा संतप्त सवालच अन्य एका ज्येष्ठ नेत्याने या बैठकीत केला. संजय राऊतांची यापूर्वी दोन-तीनदा उद्धव ठाकरेंकडे काँग्रेसतर्फे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, ज्या पद्धतीने ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार घोषित केला, त्यावरून राऊतांच्या भूमिकेशी ठाकरे सहमत असल्याचे काँग्रेसच्या लक्षात आले. सांगलीत चंद्रहार पाटील काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यासाठी माघार घेण्यास तयार असताना संजय राऊत यांनी चंद्रहार यांच्या उमेदवारीचा आग्रह धरल्याने उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केल्याचे सांगितले जाते.

वडेट्टीवार, पटोलेंचा लढण्यास नकार

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आपली कन्या शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळावी, असा आग्रह विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी धरला होता. मात्र, काँग्रेस पक्षाने वडेट्टीवार हे स्वतः लढत असतील, तर त्यांना उमेदवारी देऊ; अन्यथा प्रतिभा धानोरकर यांचा विचार केला जाईल, असे त्यांना सांगितले. धानोरकर यांनीही वडेट्टीवार लढत असतील, तर आपला त्यांना पाठिंबा राहील, असे पक्षाला कळविले. मात्र, काँग्रेस नेत्यांच्या या अनपेक्षित पवित्र्याने वडेट्टीवारांची पंचाईत झाली. त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींना आपण लढण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले. त्यामुळे धानोरकरांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच नाना पटोले यांनाही भंडारा-गोंदिया येथे लोकसभा लढण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनीही नकार दिला असल्याचे वृत्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT