Latest

स्वस्त मरण… नशेच्या गोळ्यांचा बाजार!

Arun Patil

सांगली, सचिन लाड : सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांनी सांगली, मिरजेसह जिल्ह्यात नशेच्या गोळ्यांचा अक्षरक्ष: बाजाराच मांडला आहे. पोलिसांच्या कारवाईवरून हे सिद्ध होते. मुंबईतून या गोळ्यांची तस्करी केली जाते. शरीराला घातक ठरणार्‍या या गोळ्यांच्या आहारी मिसरूड न फुटलेली पोरं आहारी गेले आहेत. अवघ्या 50 रुपयाला एक गोळी विकली जाते.

दोनच दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एका सराईत गुन्हेगारास पकडून त्याच्याकडून नशेच्या 280 गोळ्या व बाराशे ग्रॅम गांजा जप्त केला. या गोळ्या त्याने मुंबईतील 'बच्चूभाई' याच्याकडून आणत असल्याचे निष्पन्न झाले. मुंबईतून गोळ्यांची तस्करी व जिल्ह्यातून गांजाची तिकडे तस्करी करणारे 'रॅकेट'च आहे. या 'रॅकेट'मध्ये सराईत गुन्हेगारी टोळ्यांनी तस्करीचा बाजारच मांडला आहे. गोळ्याचे सेवन केले तर मुखातून कोणत्याही प्रकारचा वास येत नाही. त्यामुळे तरुण पोरं मोठ्या प्रमाणात या गोळ्यांच्या आहारी गेले आहेत. कुपवाडमध्ये काही औषध दुकानातून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सर्रास या गोळ्या देत असल्याचे गेल्या आठवड्यात पोलिसांच्या कारवाईवरून स्पष्ट झाले होते.

कुपवाडमध्ये तीन दिवस मोफत गोळी

कुपवाड येथे एका सराईत गुन्हेगाराने पोलिसांना हाताशी धरून गोळ्या विक्रीचा अड्डाच सुरू केलाय. त्याचा हा उद्योग खूप दिवसांपासून सुरू आहे. तो पहिल्यांदा तीन दिवस मोफत गोळी देतो. तीन दिवस सेवन झाल्यानंतर मग सवयच लागते. विशेषत: तरुण पोरांची त्याच्याकडे गोळी घेण्यासाठी रांग लागलेली असते. दररोज त्याची हजारो रुपयांची उलाढाल असते.

नशेसाठी कायपण…

नशेसाठी काय पण…अशी सध्या तरुणांची परिस्थिती आहे. गांजा, व्हाईटनर, झेंडू बाम याचा नशेसाठी वापर केला जातो, मात्र आता गोळी नाही मिळाली तर त्यांना कशाचे भान राहत नाही. मग ते कोणताही गुन्हा करण्यासाठी मागे-पुढेही पाहत नाहीत. गेल्या दोन वर्षांतील वाढत्या गुन्हेगारीचा आलेख पाहिला तर खून, खुनाचा प्रयत्न हे गुन्हे नशेच्या गोळ्यांचे सेवन करून केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

गोळ्यांचे दुष्परिणाम

* स्मरणशक्ती कमी होणे.
* चालताना धाप लागणे.
* चिडचिड होणे
* भूक मंदावणे, मळमळणे.
* लिव्हर, किडनी खराब होणे.
* मेंदूतील घटक कमी होणे.
* सातत्याने नशेत राहण्याची सवय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT