पुणे; पुढारी वृत्तसेवा: शालेय विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत असून तज्ज्ञांशी चर्चा करून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले. तसेच मुलांना शाळेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करता यावे, म्हणून शाळांच्या वेळा कमी करण्याकडे भर देणार असल्याचेही त्यांनी येथील दुसर्या कार्यक्रमात सांगितले.
शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केसरकर म्हणाले, मुलांना अतिरिक्त ताण देऊ नये. त्यांच्या मेंदूचा विकास होऊ दिला पाहिजे. शिक्षकांसाठी गृहपाठ ही पळवाट असता कामा नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कमी वेळेत पटकन समजेल असे शिकवावे, जेणेकरून त्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे. परंतु हा मोठा निर्णय असून याबद्दल शिक्षक संघटना, संस्था चालक यांच्याशी बोलणार आणि मग त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
गृहपाठ रद्द होणार नाही : मुख्यमंत्र्यांचे संकेत
विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येईल असा कोणताही निर्णय राज्य सरकार घेणार नाही असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहपाठ रद्द करण्याचा निर्णय घेतला जाणार नसल्याचा संकेत दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली. यानिमित्ताने राज्य सरकारमधील विसंवाद पुन्हा एकदा समोर आला.
डॉक्टरांना डीआर तसे शिक्षकांना टीआर?
डॉक्टरांसाठी डीआर, वकिलांसाठी एडीव्ही वापरले जाते तसेच शिक्षकांसाठी टीआर संबोधता येईल का यावर विचार सुरू आहे. मी जेव्हा शिक्षकांकडून अपेक्षा ठेवतो तेव्हा शिक्षणमंत्री म्हणून त्यांना मान देण्याची जबाबदारी माझीसुद्धा असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
पुस्तकालाच वह्यांची पाने जोडणार
पुस्तकांमध्येही बदल केला जाणार आहे, एक धडा झाल्यानंतर वह्यांची दोन पाने त्यालाच जोडली जाणार आहेत. धडा वाचून मुले त्यात नोंदी घेऊ शकतात. हे पुस्तक तीन भागात असणार आहे. पुढील वर्षी विद्यार्थी शाळेत जाताना एकच पुस्तक घेऊन जाईल.