Latest

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या भाताच्या 88 वाणांचे संवर्धन !

अमृता चौगुले

पुणे : भारतात लाख-दोन लाखांहून अधिक भाताचे वाण होते. त्यापैकी सध्या केवळ 150 ते 200 वाण शिल्लक असून, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या तब्बल 88 वाणांचे खेड तालुक्यातील सह्याद्री स्कूलच्या नैसर्गिक शेतीमध्ये संवर्धन केले जात आहे. भाताचे हे वाण टिकले पाहिजेत, वाढले पाहिजेत यासाठी शाळेच्या वतीने परिसरातील शेतक-यांमध्ये जनजागृती केली जाते. आपल्या देशातील प्रत्येक प्रदेशात त्या-त्या भागातील माती, त्या परिसराच्या गरजेनुसार भाताचे वाण विकसित झाले होते. यामध्ये हाडाच्या मजबुतीसाठी, थंडीसाठी, उन्हाळ्यात खाण्यासाठी, अ‍ॅन्टी डायबेटिस, अ‍ॅन्टी कॅन्सर असे प्रचंड औषधी गुणधर्म असलेले, तर काही भात ज्यामध्ये प्रचंड पोषणमूल्य असल्याने केवळ राजे-महाराज व सैनिकांनी खाण्यासाठी राखीव ठेवलेले भाताचे वाण आपल्या देशात होते.

यापैकी भाताचे लाखो वाण नामशेष झाले असून, केवळ 150 ते 200 वाण शिल्लक आहेत. या वाणांचे संवर्धन व वाढविण्यासाठी सह्याद्री स्कूल प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांत निसर्गाचा लहरीपणा, संकरित भाताच्या बियाण्यांच्या वाढलेल्या किमती, खतांचा तुटवडा व मजुरीचा खर्च यामुळे भातशेती नकोशी झाली आहे. या पाश्र्वभूमीवर सह्याद्री स्कूलच्या नैसर्गिक शेतीत या दुर्मीळ भाताच्या वाणाचे संवर्धन केले जात आहे. खेड तालुक्यात चासकमान धरणाच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री स्कूलच्या नैसर्गिक शेतीत अशा अनेक पारंपरिक व देशी पिकांच्या विविध वाणांचे संवर्धन केले जाते. सह्याद्री स्कूल देशी बियाणे संवर्धक व समन्वयक दीपा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून येथे नैसर्गिक शेती केली जाते. तब्बल 65 एकर परिसरात ही निवासी शाळा असून, येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पौष्टिक, शुध्द व विषमुक्त अन्न मिळावे म्हणून शाळेच्या परिसरातच मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेतीचे अनेक प्रयोग केले जातात.
भाताचे विविध प्रकार ज्यांची नावे तुम्ही ऐकली नसतील

इंद्रायणी, बासमती, कोलम, आंबेमोहर अशी काही नावे सोडली, तर आपल्या भाताचे फारसे प्रकार माहीत नाहीत. पण मुणगा, पार्वती चिनोर, चकावह, तुळश्या, नांदेड हिरा, जीर-खरपूड, साईभोग, बासमती, तळोदी रेड, नवारा ब्लॅक हस्क, नवारा ब्लॅक गोल्ड, पुसा, कसबाई, जोधळी जिलगा, तुळश्या, ढवळ, घनसाळ अशी शेकडो नावे आणि भाताचे प्रकार तुम्हाला सह्याद्री शाळेच्या नैसर्गिक शेतीत पाहण्यास मिळतील.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT