Latest

Congress Reaction on Azad : ‘गुलाम नबी आझाद हे कपटी; विश्वासघातकी’! काँग्रेसची जहरी टीका

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Congress Reaction on Azad : गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेससोबतचे ५१ वर्षे जुने नाते तोडून आता नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस नेते संतप्त झाले आहेत. दरम्यान, ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी त्यांच्या डीएनएवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जयराम रमेश म्हणाले की, गुलाम नबी आझाद यांच्या डीएनएमध्ये बदल करण्यात आला आहे. आझाद यांना काँग्रेस नेतृत्वाने नेहमीच आदर दिला. पण त्यांनी अत्यंत वैयक्तिक आणि खोडसाळ आरोप करून विश्वासघात केला आहे. आझाद यांच्या या वृत्तीने त्यांचा खरा चेहराच समोर आला आहे, अशी जहरी टीका त्यांनी ट्विटरद्वारे केली.

जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'ज्या व्यक्तीचा काँग्रेस नेतृत्वाने सर्वाधिक आदर केला, त्याच व्यक्तीने काँग्रेस नेतृत्वावर वैयक्तिक हल्ला करून आपले खरे चारित्र्य दाखवून दिले आहे. आधी मोदींचे संसदेत अश्रू, मग पद्मविभूषण, हा योगायोग नसून सहकार्य असल्याचा त्यांनी टोला लगावला आहे. तसेच, काँग्रेस पक्ष सध्या देशातील महागाई आणि बेरोजगारीविरोधात लढत असून अशा वेळी गुलाम नबी आझाद यांचे पक्षापासून वेगळे होणे दुर्दैवी आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष मुद्द्यांवरून भाजपशी संघर्ष करत असताना हे घडणे खेदजनक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Congress Reaction on Azad)

आझाद यांच्या राजीनाम्यातून विश्वासघाताचा येतोय वास : संदीप दीक्षित

माजी खासदार संदीप दीक्षित यांनी गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यावरून जोरदार टीका करत आझाद यांनी काँग्रेसशी विश्वासघात केल्याचे म्हटले आहे. आझाद यांना लिहिलेल्या पत्रात दीक्षित म्हणाले की, पक्ष सोडण्याऐवजी बदल शोधत राहणे आवश्यक आहे. तुमचे (आझाद यांचे) पत्र वाचल्यानंतर निराशा आणि दुर्दैवाने विश्वासघात झाल्याची भावना मनात दाटून येते', असे त्यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी यांना ऑगस्ट 2020 मध्ये पत्र लिहून पक्षासाठी नव्या नेतृत्वाची मागणी करणा-या जी २३ नेत्यांच्या यादीत दीक्षित यांचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी आझाद यांना साथ दिली होती. पण आझाद यांच्या राजीनाम्यानंतर दीक्षितांनी माजी ज्येष्ठ नेत्यावर टीकास्त्र सोडले आहे. (Congress Reaction on Azad)

ऑगस्ट 2020 मध्ये काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या मुलाने सांगितले की, "आम्ही पक्षांतर्गत सुधारणांचा झेंडा उभारला, बंडखोरी नाही. तुम्ही काँग्रेस अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रावर मी स्वाक्षरी केली. मीडियातील काहींनी त्याला जी २३ गट असे संबोधले. त्या गटाचा मी भाग बनलो होतो.'

मोदींच्या हातात रिमोट कंट्रोल : पवन खेरा

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी हा काँग्रेसला कमकुवत करण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आझाद यांचा रिमोट कंट्रोल पंतप्रधान मोदींच्या हातात आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्या गुलाम नबी आझाद यांचे मोदींवरील प्रेम आपण स्वतः संसदेत पाहिले आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन चूक केल्याचे वाटत असेल तर त्यांनी त्याविरोधात आवाज उठवायला हवा होता', असेही खेरा यांनी म्हटले आहे. (Congress Reaction on Azad)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT