Latest

Donate for Justice Campaign : काँग्रेसचे ‘डोनेट फॉर देश’ नंतर ‘डोनेट फॉर न्याय’ देणगी अभियान

backup backup


नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :
काँग्रेस पक्षाने 'डोनेट फॉर देश' या देणगी अभियानानंतर 'डोनेट फॉर न्याय' हे दुसरे देणगी अभियान सुरु केले आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत पहिल्या २ तासातच २ कोटी जमा झाले, अशी माहिती काँग्रेसच्या वतीने देण्यात आली.

'डोनेट फॉर न्याय' संदर्भात काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ६७०० किमी प्रवास करणार आहे. त्या पार्श्वभुमीवर १ पैसा प्रति किमी असे ६७ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पैसे देता येईल. ६७० रुपये देणाऱ्या देणगीदात्यांना राहुल गांधींची स्वाक्षरी असलेले टी शर्ट देण्यात येईल. तर, ६७००० रुपये देणाऱ्या देणगीदात्यांना एक किट मिळेल. त्यात बँड, टीशर्ट, भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर आणि एक पिशवी मिळणार आहे. तसेच राहुल गांधींच्या स्वाक्षरीचे पत्र मिळणार आहे. तसेच सर्व देणगीदात्यांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, कोषाध्यक्ष अजय माकन यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

'डोनेट फॉर देश' अभियानाअंतर्गत आतापर्यंत १७ कोटी रुपये जमा झाले आहेत. लवकरच हा आकडा २० कोटीच्या पुढे जाईल, या अभियानात ८३% देणगी यूपीआयच्या माध्यमातून प्राप्त झाल्याचेही अजय माकन म्हणाले. कुठल्याही पक्षाच्या देणगी अभियानापेक्षा काँग्रेस पक्षाच्या देणगी अभियानाला सर्वोत्तम प्रतिसाद मिळाल्याचेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला अजय माकन यांच्यासह काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश, खासदार इम्रान प्रतापगढी, प्रोफेशनल काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती उपस्थित होते.

दरम्यान, यापुर्वी 'डोनेट फॉर देश'  या अभियानासंदर्भात काही गैरप्रकार समोर आले होते. यावर बोलताना अजय माकम म्हणाले की, 'डोनेट फॉर देश'च्या संकेतस्थळासारखेच संकेतस्थळ तयार करुन पहिल्या दोन दिवसातच ५० हजाराहुन अधिक सायबर हल्ले (फिशिंग अटॅक) अधिकृत संकेतस्थळावर झाले होते. या प्रकरणी एका २२ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. संबंधित गुन्ह्यांची कलमे लावण्यात आली  असुन पुढील चौकशी सुरु आहे. बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातुन ४०-५० हजार रुपये चुकीच्या खात्य़ात गेल्याचेही त्यांनी कबुल केले. पक्षाने तयार केलेले संकेतस्थळ ही पक्षाची संपत्ती आहे. यावर वाईट नजर असणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. यापुढे कुठलीही चूक होऊ नये, याची खबरदारी आम्ही घेत आहोत आणि चुकीच्या प्रवृत्तींवर देखील करडी नजर ठेवून आहोत, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT