Latest

महाडिक-सतेज गटात संघर्ष; ‘राजाराम’वरून बिंदू चौकात आव्हान प्रतिआव्हान

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचा संघर्ष शुक्रवारी उफाळला. वडणगे येथे प्रचार शुभारंभात दिलेल्या आव्हानानुसार माजी आमदार अमल महाडिक समर्थकांसह सायंकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात आले. यानंतर आमदार ऋतुराज पाटीलही समर्थकांसह रात्री सव्वाआठ वाजता बिंदू चौकात आले. महाडिक आणि पाटील यांनी एकमेकांवर जहरी टीका करत पुन्हा परस्परांना आव्हान दिले. दोन्ही बाजूंनी समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले, जोरदार घोषणाबाजी झाली. बिंदू चौकासह संपूर्ण परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शीघ्रकृती दलाची तुकडीही पाचारण केली होती. ठिकठिकाणी रस्ते अडवण्यात आले होते. यामुळे बिंदू चौकातील वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, या घटनेने महाडिक आणि सतेज यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

सतेज पाटील घाबरले; विरोधकांत दम नाही : अमल महाडिक

सतेज पाटील घाबरले, ते बिंदू चौकात आले नाहीत. त्यांची नीतिमत्ता खोटी आहे. विरोधकांत दम नाही, अशी जहरी टीका माजी आमदार अमल महाडिक यांनी शुक्रवारी बिंदू चौकात केली.

राजाराम कारखान्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर जाहीर माहिती देतो, तुम्हीही डी. वाय. पाटील कारखान्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बिंदू चौकात येऊन द्या. आपण सायंकाळी सात वाजता बिंदू चौकात येतो, असे आव्हान अमल महाडिक यांनी शुक्रवारी सकाळी वडणगे येथे सभेत दिले होते. त्यानुसार सांयकाळी साडे सात वाजता ते समर्थकांसह बिंदू चौकात आले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

डी. वाय. पाटील कारखान्यासंबंधी माहिती विचारली आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्याला कुठेही गालबोट लागू नये, हीच आपली भूमिका होती. पण ज्या पद्धतीने गुरूवारी एका ठिकाणी व्यासपीठावर माझ्या विरोधकांनी मला आव्हान दिले. यामुळे याच बिंदू चौकात येण्याचे आव्हान मी त्यांना केले होते. मी सात साडेसातच्या सुमारास येतोय. ही निवडणूक कारखान्याची आहे ती व्यक्तीशः नाही. ज्या पद्धतीने राजाराम कारखान्याबाबत मी बिंदू चौकात जाहीरपणे कारखान्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी सतेज पाटील, यांना आव्हान दिले होते. पण ते आलेले नाहीत. त्यांच्या कारखान्याची माहिती विचारली होती. त्यांनी आणि आम्ही दोघांनी एकमेकांसमोर येऊन माहिती देण्याचा शब्द मी त्यांना दिला होता, असे अमल महाडिक म्हणाले.

चॅलेंजला उत्तर द्या

त्यांनी त्यांच्या कारखान्याची माहिती बिंदू चौकात येऊन द्यावी. माझ्या चॅलेंजला त्यांनी उत्तर द्यावे, आज आम्ही घाबरलो नाही तर ते घाबरले. त्यांनी त्यांच्या डी.वाय.पाटील कारखान्यासंदर्भात मी विचारलेली माहिती जाहीरपणे सांगावी, हाच आमचा त्यांच्या विचारलेला जाब आहे. पण ते ही माहितीसुद्धा देऊ शकत नाही, कारण त्यांची नितिमत्ता खोटी आहे, त्यांच्याकडे उत्तर नाही त्यामुळे ते स्वत: आलेले नाहीत. विरोधक काहीही सांगतात, त्यांच्यात दम नसल्याचे अमल महाडिक म्हणाले.

आव्हान सतेज पाटील यांना आमदार ऋतुराज पाटील येत आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार का? असे विचारता महाडिक म्हणाले, मी सतेज पाटील यांना आव्हान दिले आहे. त्यांना मी विचारले होते. ज्यावेळी डी. वाय. पाटील दादा विचारतील त्यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक उत्तर देतील असे म्हणत अन्य कोणाशी बोलण्याची मला गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, किरण नकाते, नंदकुमार वळंजू, संग्राम निकम, महेश वासूदे, रहीम सनदी आदींसह महाडिक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाडिकच भ्याले, आले तर थांबले का नाहीत : आ. ऋतुराज पाटील

अमल महाडिक यांचे बिंदू चौकात येण्याचे आव्हान स्वीकारून आम्ही बिंदू चौकात आलो होतो. यायचे टायमिंग त्यांनी सांगितले होते. जायचे नाही. पण आम्ही येण्यापूर्वीच महाडिक कंपनीने येथून पळ का काढला? असा सवाल उपस्थित करत आमदार ऋतुराज पाटील यांनी महाडिक कंपनीच भ्याली असून आत्ताच नव्हे तर त्यांनी कधीही, कोणतेही ठिकाण सांगावे. अगदी शिरोलीत येऊन प्रश्न विचारण्याची धमक असल्याचे प्रतिआव्हान आमदार ऋतुराज पाटील यांनी बिंदू चौकात दिले.

ऋुतूराज पाटील यांनी शड्डू ठोकत येत्या 23 एप्रिलला राजारामचा कंडका सभासदच पाडतील, असे ठामपणे सांगितले. राजाराम कारखान्याची निवडणुक सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढवत आहोत. यावेळी आम्ही कारखान्यासंदर्भात कांही प्रश्नांची उत्तरे मागितली होती. ती देण्यासाठी अमल महाडीक यांनी शुक्रवारी बिंदू चौकात येण्याचे आव्हान दिले होते. ते स्विकारुन बिंदू चौकात आल्याचे सांगून ऋुतूराज पाटील यांनी आम्ही येण्यापुर्वीच त्यांनी येथून पळ काढल्याचे सांगितले. आमच्या प्रश्नाची उत्तरे त्यांना देता येत नाहीत, हेच यावरुन स्पष्ट होते.

गेली 28 वर्ष त्यांची कारखान्यावर सत्ता आहे. पण त्यांनी ऊसाला दर दिलेला नाही. मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व दिले नाही. विरोधी 29 सभासदांचे अर्ज सत्तेचा वापर करुन अपात्र केले. असेही ऋुतूराज पाटील म्हणाले.

सत्तेचा वापर करुन आम्हाला पोलसांमार्फत रोखून धरले

आव्हान स्विकारुन आम्ही बिंदू चौकात जात होतो. मात्र सत्तेचा वापर करुन पोलिसांमार्फत आम्हाला रोखले. मी सव्वासात, साडेसातच्या दरम्यानच आलो आहे. असेही ऋुतूराज पाटील म्हणाले.

थोरले महाडीक आले की सतेज पाटील येतील

अमल महाडीकांच्याविषयी बोलायची मला गरज नाही. आम्ही कोणाला घाबरत नाही. ज्यावेळी थोरले महाडीक येतील. त्यावेळी सतेज पाटील हे मोठ्या ताकदीने येतील, सतेज पाटील घाबरत नाहीत असेही ऋुतूराज पाटील म्हणाले.

दिशाभूल करण्यासाठी बिंदू चौकातले आव्हान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम बिंदू चौकात असताना त्यांनी बिंदू चौकात येण्याचे आव्हान देउन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. असेही ऋुतूराज पाटील म्हणाले.

यांच्यासोबत आमदार जयश्री जाधव, कॉग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, भारती पोवार, गणी आजरेकर, राजेश लाटकर, शारंगधर देशमुख, विनायक फाळके, अर्जुन माने, प्रा. महादेव नरके आदीसंह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT