Latest

भारत आणि चीन तणावाचा बर्फ वितळणार का?

Arun Patil

गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर या सीमावादाचे रूपांतर तणावात झाले. दोन्ही देशांदरम्यान लष्करी पातळीवरील चर्चेच्या 20 फेर्‍या झाल्या असून चीननेही काही भागात माघार घेतली आहे. परंतु मुख्य मुद्द्यांबाबत अद्यापही चीनचा अडेलतट्टूपणा कायम आहे. सीमावाद सुरू झाल्यापासून दोन्ही देशांचे सुमारे 50 सैनिक आमने-सामने आहेत. यंदाचा हा चौथा हिवाळा असून या थंड ऋतूत तरी हा तणावाचा बर्फ वितळणार का याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर निर्माण झालेला भारत आणि चीन सीमेवरील तणाव तीन वर्षे उलटूनही कायम आहे. आता हिवाळा सुरू आहे. हा सलग चौथा हिवाळा असेल जेव्हा भारत आणि चीनचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आमने-सामने असतील. दोन्ही देशांदरम्यान लष्करी पातळीवरील चर्चेच्या 20 फेर्‍या झाल्या असून चीननेही काही भागात माघार घेतली आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतलेल्या भागात गलवान, पँगाँग, फिरात्सोचा उत्तर आणि दक्षिण किनारा, गोगरा-हॉट, स्प्रिंग्स क्षेत्रातील पेट्रोलिंग पॉईंटस् 17 आणि 15 यांचा समावेश आहे. या ठिकाणी डी-मिलिटराइज्ड बफर झोन तयार करण्यात आले आहेत. परंतु अनेकवेळा चर्चेनंतरही डेमचौक आणि डेपसांग क्षेत्रांबाबत कोणताही तोडगा निघाला नाही.

भारत-चीन कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची 20 वी फेरी 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी भारतीय सीमेवरील चुशुल-मोल्डो सीमा बैठक बिंदूवर आयोजित करण्यात आली होती. यानंतर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही देशांच्या राष्ट्रीय नेतृत्वाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार आणि 13-14 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या कॉर्प्स कमांडर्सच्या बैठकीच्या शेवटच्या फेरीत झालेल्या प्रगतीच्या आधारे, दोन्ही बाजूंनी पश्चिम क्षेत्रातील गस्त कमी करण्यास सहमती दर्शविली. उर्वरित समस्यांचे लवकर निराकरण करण्यासाठी स्पष्ट, खुले आणि रचनात्मक पद्धतीने विचारांची देवाणघेवाण केली. चीनने लष्करी आणि मुत्सद्दी यंत्रणांद्वारे संवाद आणि वाटाघाटीची गती कायम ठेवण्याचे मान्य केले. तसेच सीमावर्ती भागात तळागाळात शांतता राखण्याची वचनबद्धताही व्यक्त केली. यावरून हे स्पष्ट झाले की, पूर्व लडाखमधील एलसीवर सुरू असलेली अडवणूक संपवण्यासाठी सीमा चर्चेला कोणतेही महत्त्वपूर्ण यश मिळू शकले नाही. कारण कळीच्या मुद्द्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय यामध्ये घेतलेला नाही. चीनने डेमचौक आणि डेपसांग या भागांवर वाटाघाटी करण्यास नकार दिल्यामुळे सीमावाद सोडवला जात नसल्याचे मानले जात आहे.

सीमावाद सुरू झाल्यापासून दोन्ही देशांचे सुमारे 50 सैनिक आमने-सामने आहेत. सीमावाद अनिर्णीत राहिल्यास ते चीनासाठी फायदेशीर आहे. भारत अलीकडील काळात अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांशी मैत्री आणि सक्रियता वाढवत आहे, जेणेकरून चीनवर दबाव आणता येईल. त्याचवेळी चीनला सीमेवरील तणाव कायम ठेवायचा आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन तो भारतावर दबाव आणू शकेल. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या मते, चीन सीमेचा वाद लवकर सोडवणार नाही. मे 2220 पूर्वी अस्तित्वात असलेली परिस्थिती निर्माण करण्यात चीन अजूनही कचरत आहे.

भारताने चीनच्या सीमेवर पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे आणि खर्चातही लक्षणीय वाढ केली आहे. 2014 पासून सीमेवर लष्कर आणि हवाई दलाची तैनाती वाढली आहे. बुमलिंग ला येथील डॅम चौकाजवळील जगातील सर्वात उंच रस्ता झोजिला पास पुन्हा खुला केला आहे. लडाखमधील कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाच्या असलेल्या 16 पासांवर भारताची स्थिती अधिक चांगली आहे. चीनच्या प्रत्येक आव्हानाला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे. दोन्ही बाजू लष्करी आणि मुत्सद्दी यंत्रणांद्वारे संवाद कायम ठेवत आहेत. इंडो-पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेसोबतच्या कारवाया वाढवून आणि इतर देशांशी राजनैतिक करार करून भारतही चीनवर दबाव आणत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT