Latest

‘राजाराम’, ‘गोकुळ’मुळे पुन्हा पाटील-महाडिक संघर्ष

Arun Patil

कोल्हापूर, विकास कांबळे : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि गोकुळची चार दिवसांवर आलेली सर्वसाधारण सभा यामुळे माजी आ. महादेवराव महाडिक व आ. सतेज पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. आतापर्यंतचा संघर्ष हा थेट महादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यात होता. परंतु आता महादेवराव महाडिक यांच्या ऐवजी अमल महाडिक, शौमिका महाडिक व खा. धनंजय महाडिक हे पाटील यांच्या आरोपांना थेट उत्तर देताना दिसत आहेत. यामध्ये खा. महाडिक आक्रमक असल्यामुळे यापुढे जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक यांच्यामध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

आ. सतेज पाटील आणि माजी आ. महादेवराव महाडिक यांच्यात दिवसेंदिवस संघर्ष वाढत राहिल्याने तो राजकारणापुरता मर्यादित न राहता एकमेकांवर वैयक्तिक आरोप करण्यापर्यंत गेला. पाटील यांनी महाडिक यांना दिसेल तेथे रोखण्याचा प्रयत्न केला. बर्‍यापैकी त्यांना यश आले. परंतु राजारामच्या निवडणुकीत मात्र त्यांना अपयश आले. या निवडणुकीत महाडिक गटाचे सुमारे 1200 सभासद अपात्र ठरविण्यासाठी पाटील गटाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई केली. परंतु मतदानापासून त्यांना रोखण्यात पाटील गटाला यश आले नाही.

उलट महाडिक गटाने घेतलेल्या आक्षेपामुळे पाटील गटाच्या तगड्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर थांबावे लागले. यावरून प्रचंड आरोप-प्रत्यारोप दोन्ही गटाकडून झाले होते. या निवडणुकीत महाडिक गटाने एकतर्फी विजय मिळवला. महाडिक गटासाठी हा विजय अतिशय महत्त्वाचा होता. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देखील अपात्र सभासदांबाबत पाठपुरावा पाटील गटाने सुरूच ठेवला. त्याचा निकाल पाटील गटाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी थेट फेरनिवडणुकीचीच मागणी केली आहे. त्यावर अमल महाडिक व धनंजय महाडिक यांनी नेहमीच्या भाषेत उत्तर दिले आहे.

वादाला 'कोल्हापूर दक्षिण' राजकारणाचीही किनार

'राजाराम'च्या अगोदर 'गोकुळ'ची निवडणूक झाली होती. तरीही गोकुळच्या कारभारावर सातत्याने प्रश्न उपस्थित करत संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळचा कारभार चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा रोख नेहमी गोकुळमधील संचालकांऐवजी नेत्यांवर राहिला आहे. गोकुळची सर्वसाधारण सभा येत्या आठवड्यात आहे. त्यामुळे महाडिक यांनी संपर्क दौरे सुरू केले आहेत. या दौर्‍यावरही आ. पाटील यांनी टीका केली आहे. या दोघांच्या वादाला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकारणाचीही किनार आहे. त्यामुळे आ. पाटील व महाडिक गटातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT