पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीओ (IPO) मार्केटमध्ये लवकरच आणखी एका दिग्गज कंपनीचे नाव जोडले जाऊ शकते. मॅनफोर्स कंडोम (Manforce condom) आणि प्रेग्नेंसी किट प्रेगा न्यूज (Prega News)ची विक्री करणारी दिग्गज फार्मा कंपनी मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासाठी खाजगी इक्विटी फर्म क्रिसकॅपिटल-निवेशित मॅनकाइंड फार्मा कंपनीने बाजार नियामक संस्था सेबी (SEBI)कडे मसुदा विवरणपत्र दाखल केले आहे.
लाईव्हमिंट (Livemint)च्या वेबसाइटवरील वृत्तानुसार, आयपीओ (IPO)मध्ये कंपनीच्या प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांद्वारे 4 कोटी (40,058,844) इक्विटी समभाग विक्रीची ऑफर (OFS) असेल. रमेश जुनेजा, राजीव जुनेजा, शीतल अरोरा, रमेश जुनेजा फॅमिली ट्रस्ट, राजीव जुनेजा फॅमिली ट्रस्ट आणि प्रेम शीतल फॅमिली ट्रस्ट हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.
अर्थ विषयक वृत्त देणा-या मनीकंट्रोलच्या वेबसाईटवर म्हटलंय की, मॅनकाइंड फार्मा कंपनीचा आयपीओ 70 कोटी डॉलर (5587 कोटी रुपये) पेक्षा जास्त असू शकतो. जर मॅनकाइंडचा आयपीओ इतका मोठा असेल तर तो फार्मा क्षेत्रातील दुसरा सर्वात मोठा आयपीओ ठरेल. या क्षेत्रातील सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम ग्लँड (Gland Pharma)च्या नावावर आहे. या कंपनीने नोव्हेंबर 2020 मध्ये 86.9 कोटी डॉलर्सचा आयपीओ लाँच केला होता.
या वर्षी एप्रिलमध्ये, मॅनकाइंड फार्माने अॅग्रीटेक सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी मॅनकाइंड अॅग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड लाँच करण्याची घोषणा केली. तसेच कंपनी पुढील दोन-तीन वर्षांत 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असेही जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, फेब्रुवारी 2022 मध्ये मॅनकाइंडने पॅनासिया बायोटेक फार्माच्या फॉर्म्युलेशन ब्रँडची 1,872 कोटींमध्ये खरेदी केली होती.
मॅनकाइंड फार्मा ही भारतातील अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपनी आहे. 1991 मध्ये तिची स्थापना झाली. ब्रँडेड जेनेरिक औषधांव्यतिरिक्त, कंपनीच्या आघाडीच्या ब्रँडमध्ये प्रेगा-न्यूज प्रेग्नन्सी टेस्टिंग किट, मॅनफोर्स कंडोम, गॅस-ओ-फास्ट आयुर्वेदिक अँटासिड आणि मुरुमांवर उपचार करणारे औषध एक्नेस्टार यांचा समावेश आहे. 31 मार्च 2022 पर्यंत, कंपनीकडे हिमाचल प्रदेश, सिक्कीम, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांसह संपूर्ण भारतात 23 उत्पादन सुविधा आहेत.
2020, 2021 आणि 2022 या आर्थिक वर्षांसाठी, भारतातील कामकाजातून कंपनीचा महसूल अनुक्रमे ₹5,788.8 कोटी, ₹6,028 कोटी आणि ₹7,594.7 कोटी होता. भारतानंतर, अमेरिका, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ ही प्रमुख बाजारपेठ आहेत. 2015 मध्ये, कॅपिटल इंटरनॅशनलने क्रिस्कॅपिटलकडून 200 दशलक्ष डॉलर्समध्ये मॅनकाइंडमधील 11% हिस्सा खरेदी केला. एप्रिल 2018 मध्ये क्रिस्कॅपिटलने पुन्हा अंदाजे 350 मिलियन डॉलरमध्ये 10 टक्के हिस्सेदारी खरेदी केली.