पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला संघाने लॉन बॉलमध्ये इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताच्या महिला संघाने देशाच्या पदतालिकेत आणखी एका सुवर्ण पदकाची नोंद केली आहे. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७ विरुद्ध १० असा पराभव करून सुवर्णपदकावर कब्जा केला. याआधी सेमीफायनलमध्ये झालेल्या निकराच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभव करून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अखेर आज (दि. २) भारताच्या जिगबाज महिक्ला संघाने लॉन बॉल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरशीचा सामना झाला. भारताची सुरुवात चांगली झाली होती, पण तीन फेऱ्यांनंतर उभय संघाचे गुण ३-३ असे बरोबरीत होते. यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर देत ७ व्या फेरीनंतर ८-२ अशी आघाडी घेतली. मात्र, ही आघाडी भारताकडे फार काळ टिकली नाही आणि या फेरीनंतर दक्षिण आफ्रिकेने आघाडी घेण्यास सुरुवात केली आणि १२ व्या फेरीनंतर एका क्षणी दोघांचे गुण १०-१० असे बरोबरीत आले. यानंतर टीम इंडियाने वर्चस्व राखले आणि आघाडी मिळवली, जी शेवटपर्यंत कायम राहिली. लवली चौबे, रूपा राणी तिर्की, नयनमोनी सैकिया आणि पिंकी यांच्या चौकडीचे आज देशभरात कौतुक होत आहे.
भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास रचला होता, कारण त्याआधी भारताने लॉन बॉलमध्ये एकही पदक जिंकले नव्हते. 92 वर्षांच्या इतिहासात भारताने या स्पर्धेत पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील भारताच्या पदकांची संख्या आता 10 झाली आहे, ज्यामध्ये 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे.