नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : महागाईने आधीच होरपळत असलेल्या जनतेला सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून आणखी एक शॉक बसण्याची शक्यता आहे. याचे कारण पुढील महिन्यात सीएनजी (कॉम्प्रेसड नॅचरल गॅस) व पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) गॅसच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
'आयसीआयसीआय सिक्युरिटीज'ने आपल्या ताज्या अहवालाद्वारे ही माहिती दिली आहे.
दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात सीएनजीचा व पीएनजी गॅसचा वापर केला जातो.
सीएनजीचा वापर प्रामुख्याने वाहनांमध्ये केला जातो तर पीएनजीचा वापर घरगुती कारणांसाठी केला जातो.
आगामी काळात सरकारकडून वायूच्या दरात 76 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाऊ शकते, त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीचे दर दहा टक्क्यांपेक्षा जास्तीने वाढू शकतात, असे 'आयसीआयसीआय सिक्युरिटीज'चे म्हणणे आहे.
सध्या दिल्लीत सीएनजीची प्रतिकिलो किंमत 45.20 रुपये आहे, तर पीएनजीची किंमत 30.91 रुपये आहे.
नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद येथे सीएनजी 50.90 रुपये तर पीएनजी 30.86 रुपयांना विकले जात आहे.