Latest

चॉकलेट मेकिंगचं करिअर

Arun Patil

चॉकलेट केवळ लहान मुलेच खातात असे नाही, तर तरुणवर्गामध्येही चॉकलेटची क्रेझ दिसून येते. खास दिनानिमित्त भेट देण्यासाठी चॉकलेट हा चांगला पर्याय मानला जातो. त्यामुळे माहिती घेतल्यास चॉकलेट तयार करण्याच्या व्यवसायात करिअरच्या अनेक संधी आहेत.

प्रत्येकजण आपापल्या पसंतीनुसार चॉकलेट खरेदी करतो. प्रिय व्यक्तीला भेट देण्यासाठी चॉकलेटला पसंती दिली जाते. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आणि सणासुदीला मिठाईऐवजी आता चॉकलेटचे पॅक भेट म्हणून देण्याची क्रेझ वाढते आहे. त्यामुळे चॉकलेट हे विशिष्ट हंगामासाठी नव्हे तर वर्षभर खपणारे उत्पादन बनले आहे. डार्क चॉकलेट आरोग्यासाठीही हितावह मानले गेले आहे. त्यामुळे चॉकलेटच्या बाजारपेठेत तब्बल 13 टक्के दराने वृद्धी होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

चॉकलेट तीन ते चार महिन्यांपर्यंत आरामात टिकू शकते. याखेरीज चॉकलेटचे आवडीनुसार फॅन्सी पद्धतीने आकर्षक पॅकिंग करता येते. आजकाल तर चॉकलेटच्या कस्टमायझेशनचेही प्रयोग मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार चॉकलेट बनवून दिली जातात. शहरांमधून हल्ली होममेड चॉकलेटची मोठी क्रेझ आहे. घरात तयार केलेली चॉकलेटस् अनेक फ्लेवरमध्ये उपलब्ध असतात. घरच्या घरी हा व्यवसाय करण्यासाठी जास्त भांडवलाचीही गरज नसते.

स्वयंपाकघरातच एक छोटासा मेल्टर, मायक्रोवेव्ह, फ्रिज आणि मोल्डच्या साह्याने चॉकलेट तयार केले जाऊ शकते. या साध्या-साध्या उपकरणांद्वारे सुमारे 50 किलो वजनांपर्यंतची चॉकलेटस् तयार करता येऊ शकतात. चॉकलेट तयार करण्याचा व्यवसाय तीन प्रकारांनी सुरू केला जाऊ शकतो. पहिल्या टप्प्यात एक ते दोन लाख रुपये भांडवल गुंतवून हा व्यवसाय घरच्या घरी सुरू होऊ शकतो.

हे काम करण्यासाठी प्रशिक्षित कामगारांची गरज नसते. केवळ दोन ते तीन मदतनीस गरजेचे असतात. दुसरा प्रकार म्हणजे पार्लर किंवा डिझाइनर शॉप उघडून हा व्यवसाय केला जाऊ शकतो. या प्रकारच्या व्यवसायासाठी मेल्टर, कूलिंग मशिन किंवा फ्रिज, डिस्प्ले युनिट अशा उपकरणांची गरज भासते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे युनिट उभारायचे असेल, तर प्लांट उभारता येणे शक्य असते. त्यासाठी किमान आपल्याकडे 50 लाख रुपयांचे भांडवल असण्याची गरज असते. या प्रकारच्या युनिटमध्ये शेफ आणि कामगार अशा दोन्ही स्वरूपांत मनुष्यबळ लागते. याखेरीज यंत्रसामग्रीचीही गरज असते. चॉकलेट मेल्टिंग-टेम्परिंग मशिन, मोल्डिंग मशिन, कोटिंग मशिन, चॉकलेट व्हायब्रेशन टेबल मशिन, स्क्रेपर आणि एझिटेटर, कूलिंग मशिन अशी यंत्रे मोठ्या युनिटसाठी आवश्यक असतात.

कोकोच्या बियांपासून चॉकलेट तयार केले जाते. चॉकलेट बनविण्याचा व्यवसाय जे युवक-युवती करू इच्छितात, त्यांनी चॉकलेट मेकिंगचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे असते. चॉकलेटचा दर्जा कसा राखायचा, हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यावरच समजू शकते. तसेच चॉकलेट किती तापमानात तयार करायचे, त्याचे फ्रीजिंग आणि पॅकिंग कसे करायचे, या गोष्टी या अभ्यासक्रमातून उलगडतात. चॉकलेट मेकिंगचा बेसिक कोर्स पाच ते सहा दिवसांचा असतो. अ‍ॅडव्हान्स कोर्सची कालमर्यादा एक महिना एवढी असते. अनेक संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

किर्ती कदम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT