Latest

पुण्यात सासरच्यांनी सुनेचे हातपाय बांधून मासिक पाळीचं रक्त विकलं, चंद्रकांत पाटील म्हणाले, “समाजात भयंकर…”

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात एका महिलेच्या सासरच्यांनी जादुटोणा करण्यासाठी तिचे हातपाय बांधून मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार केल्याची घटना घडली. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. या घटनेवर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. पुण्याचे पालकमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबईत ते विधिमंडळाबाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "पुण्यामध्ये सासरच्या लोकांनी एका महिलेला मासिक पाळीच्या वेळी हातपाय बांधून अत्यंत विचित्र प्रकार केला. ते सार्वजनिकरित्या बोलावंही वाटत नाही. सध्या विज्ञान युग असताना समाजात भयंकर अंधश्रद्धा वाढत चालली आहे. अंधश्रद्धेमुळे समाजात अशा भयानक गोष्टी घडत आहेत."

"या घटनेविषयी मी पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यानंतर ही घटना पुणे ग्रामीणमध्ये घडली असल्याचं लक्षात आलं. लागलीच मी पुणे ग्रामीण पोलिसांशी बोललो. या गुन्ह्यांतील आरोपींविरोधात जेवढी कडक कलमं लावता येतील तेवढी कडक कलमं लावा, असे निर्देश दिले आहेत," अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिली.

"असे विचित्र प्रकार करताना कायद्याची जी भीती वाटली पाहिजे ती त्यांना वाटत नाही. या गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटली पाहिजे. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील आहेत. त्यामुळे दिवसभरात बऱ्याच गोष्टी घडतील," असंही मंत्री चंद्रकांत पाटलांनी नमूद केलं.

नेमकं प्रकरण काय?

मासिक पाळी सुरू असताना महिलेशी अघोरी कृत्य तसेच तिचा छळ केल्या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह सात जणांच्या विरुद्ध अनैसर्गिक कृत्य, विनयभंग, धमकावणे मारहाण करणे, कौटुंबिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार 27 वर्षीय महिला विश्रांतवाडी भागात राहायला आहे. विवाहानंतर ती बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. पतीसह नातेवाईकांनी तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. मासिक पाळी दरम्यान आरोपींनी संगनमत करुन महिलेशी अघोरी कृत्य केले, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. छळामुळे महिला माहेरी निघून आली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT