मोबाईल, अॅप्स आदी विविध माध्यमांतून चीनने मोठ्या प्रमाणावर जगभरातील डेटा अवैधरीत्या संकलित केलेला आहे आणि त्याचा वापर करून चीनची सायबर गुन्हेगारी राजरोसपणाने सुरू आहे. केवळ अमेरिकाच नव्हे, तर भारतासह अनेक देशांमध्ये चीनचे हेरगिरीचे उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. सध्या चर्चेत आलेले न्यूयॉर्कमधील गुप्त पोलिस ठाण्यांचे प्रकरण या सर्वांवरील कडीच म्हणायला हवे! चिनी हेरगिरीचे व्यापक जाळे जगासाठी धोक्याची घंटा आहे.
युद्धामध्ये किंवा स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी केवळ आपल्यातील क्षमता, सामर्थ्य, गुणवत्ता वाढवणे गरजेचे नसून, शत्रूच्या किंवा स्पर्धकांच्या हालचालींवर, रणनीतीवर, कार्यपद्धतीवर लक्ष ठेवून राहणेही तितकेच आवश्यक असते. यासाठी युद्धनीतीमध्ये गुप्तहेरांचे मोठे महत्त्व असते. गुप्तहेरांमार्फत हेरगिरी करून मिळवलेल्या शत्रूच्या गोटातील अचूक माहितीच्या आधारे ठरवली गेलेली रणनीती विफल ठरण्याच्या शक्यता फार कमी असतात. जेम्स बाँडच्या हॉलीवूडपटांमधून गुप्तहेरांमार्फत केल्या जाणार्या हेरगिरीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आधुनिक काळात गुप्तहेरांमार्फत हेरगिरी करण्याऐवजी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाऊ लागला. यामध्ये चीनसारख्या देशाने सर्वाधिक आघाडी घेतल्याचे अलीकडील काळात दिसून आले.
काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेतील संरक्षण साहित्याच्या द़ृष्टीने महत्त्वाच्या असणार्या शहरांमधून चीनचे स्पाय बलून फिरताना आढळले होते. एखादी लक्झरी बस मावेल इतक्या आकाराच्या या बलूनच्या माध्यमातून चीनला अमेरिकेच्या संरक्षणविषयक योजनांची, तयारीची माहिती चोरायची होती. गवताच्या गंजीत पडलेली सुई शोधण्याची क्षमता असणार्या अमेरिकेला त्यांच्या देशात इतके महाकाय बलून पाठवून चीनकडून सुरू असलेल्या हेरगिरीचा बराच काळ पत्ताही लागला नाही, याचे जगाला आश्चर्य वाटले. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी हे बलून उद्ध्वस्त केले; परंतु या घटनेमुळे चीनविषयी आधीपासूनच असणारा संशय अधिक द़ृढ बनला. केवळ अमेरिकाच नव्हे, तर भारतासह अनेक देशांमध्ये चीनचे हेरगिरीचे उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.
मध्यंतरी, हुवाई या चिनी कंपनीने 5-जी तंत्रज्ञानासाठी पाश्चिमात्य राष्ट्रांशी मोठ्या प्रमाणावर सौदे केले होते; परंतु या माध्यमातून होऊ शकणार्या संभाव्य हेरगिरीच्या आणि माहिती चोरीच्या मुद्द्यावरून अनेक देशांनी या कंपनीशी असणारे करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारतानेही हीच भूमिका घेतली होती. गेल्या तीन-चार वर्षांत भारताने 'टिकटॉक'सारख्या अनेक चिनी बनावटीच्या अॅप्सवर बंदी घातली आहे. जगभरातील देशांकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर संशय व्यक्त केला जात असूनही आणि याचा एकंदर जागतिक प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होत असूनही चीनचे उद्योग काही थांबलेले नाहीत. सध्या चर्चेत आलेले न्यूयॉर्कमधील गुप्त पोलिस चौक्यांचे प्रकरण तर या सर्वांवरील कडीच म्हणायला हवे!
न्यूयॉर्क या अमेरिकेतील अतिमहत्त्वाच्या शहरामध्ये चीनचे चक्क गुप्त पोलिस ठाणे आढळून आले आहे. अमेरिकेच्या फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने याप्रकरणी दोन चिनी गुप्तहेरांना अटक केली आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला. चीनच्या राष्ट्रीय पोलिस दलातील 34 अधिकारी अमेरिकन नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देत होते, असाही आरोप 'एफबीआय'ने केला आहे. चीनचे राष्ट्रीय पोलिस दल अमेरिकेच्या भूमीवर तेथील नागरिकांवरच पाळत ठेवण्याचे काम करीत होते, ही बाब उघडपणे अमेरिकेच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारी आहे.
स्पाय बलूननंतर समोर आलेल्या या घटनेने अमेरिकेच्या सुरक्षाव्यवस्थेतील ढिसाळपणा, बेजबाबदारपणा अधिक ठळकपणाने समोर आला आहे, यात शंकाच नाही; पण याबाबत केवळ अमेरिकेवर टीका करून चालणार नाही. याचे कारण 'सीएनएन'च्या वृत्तानुसार, इटली, फ्रान्स, नेदरलँड, कॅनडा, आयर्लंडसह जगातील 53 देशांमध्ये चीनने 100 हून अधिक गुप्त पोलिस चौक्या (तळ) स्थापन केल्याची माहिती आहे. 'एफबीआय'ने या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर चीनने या पोलिस चौक्या विदेशातील चिनी नागरिकांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांना कायदेशीर मदतीसाठी, वाहन परवान्यांचे नूतनीकरण करण्यासारख्या कामांमध्ये मदतीसाठी स्थापन केल्याचे म्हटले आहे. तसेच यामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीभोवतीचा फास आवळण्यास मदत होईल, असा दावा चीनने केला आहे. त्यावर कुणाचाही विश्वास बसणे शक्य नाही. परंतु, विस्तारवादी मानसिकतेने पछाडलेल्या चीनची मजल कुठवर गेली आहे, याचे अत्यंत धक्कादायक वास्तव या प्रकरणामुळे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कॅनडातील ग्रेटर टोरांटो परगण्यामध्ये चीनच्या अशा तीन बेकायदेशीर पोलिस चौक्या आढळून आल्या आहेत. याखेरीज ग्लासगोमध्ये एक आणि लंडनमध्ये दोन पोलिस ठाणी आहेत. या पोलिस चौक्यांच्या माध्यमातून चीन आपल्या शत्रुराष्ट्रांमधील नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो; पण केवळ तेवढ्याच हेतूने ही पोलिस ठाणी स्थापन केली गेलेली नाहीत. त्यामागे अनेक उद्देश आहेत. आपल्याकडे राजकारणातील अनेक घडामोडींची, हालचालींची, मतदारांमधील प्रवाहाची नेमकी जाण त्या-त्या भागातील पोलिस चौक्यांना म्हणजेच तेथील अधिकार्यांना असते. निवडणुकांच्या काळात मतदानानंतरही साधारणतः कोणत्या भागातून कुणाला किती मतदान झाले असावे, याचा अंदाज पोलिसांना असतो. तशाच प्रकारे चीन विविध देशांमध्ये अशाप्रकारच्या पोलिस चौक्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून तेथील निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय यानिमित्ताने घेतला जात असून, तो अनाठायी म्हणता येणार नाही.
आज जगभरात फैलावलेल्या चिनी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या संचालक मंडळांवरही चीनमधील साम्यवादी पक्षातील एक व्यक्ती नेमण्याची सक्ती आहे. तसेच या कंपन्यांना विदेशातून जमा झालेली माहिती चिनी सरकारला देणे बंधनकारक आहे. चीनने जगभरातील विद्यापीठांमध्ये घुसखोरी केलेली आहे. हॉलीवूडमध्ये आजघडीला असणारी चिनी गुंतवणूक ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळेच कोरोनासारख्या भयंकर महामारीच्या पाशात जगाला ढकलूनही चीनविरोधात एकाही निर्मात्याने चित्रपट तयार करण्याची हिंमत दाखवली नाही. पाश्चिमात्य माध्यम विश्वामध्येही चीनने प्रचंड निधी गुंतवलेला आहे. या माध्यमांमध्ये भारतासह अनेक देशांविरोधातील लेख-वार्तांकने प्रसिद्ध करून चीन या देशांची प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न करत असतो.
न्यूयॉर्कमधील गुप्त पोलिस ठाण्यातून पकडलेल्या दोन व्यक्तींवर चीनच्या इशार्यावर न्यूयॉर्क शहर आणि अमेरिकेतील इतरत्र चिनी स्थलांतरितांना लक्ष्य करण्यासाठी काम करत असल्याचा तसेच अमेरिकन अधिकार्यांना सूचित न करता चिनी सरकारचे एजंट म्हणून काम करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याविरुद्ध तपास सुरू असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकार्यांशी केलेले संभाषण तातडीने हटवले. मागील काळात चीन आफ्रिकेत अशाप्रकारे हेरगिरी करत असल्याचे समोर आले होते. आता तो इतर देशांमध्येही आपले जाळे पसरवत आहे. 2018 मध्ये इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथील आफ्रिकन युनियन इमारतीत काही सर्व्हर सापडले होते. चीनने एक डिजिटल नेटवर्क तयार केले होते, ज्याद्वारे गुप्त डेटा आणि व्हिडीओ चीन सरकारकडे हस्तांतरित केले जात होते.
चिनी हेरगिरीचे हे सर्व व्यापक जाळे जगासाठी धोक्याची घंटा आहे. चीनची सीमा 14 देशांशी संलग्न असून, ड्रॅगनचा या देशांसह 22 देशांशी सीमा विवाद आहे. चीनने सहा देशांतील 41.13 लाख चौरस किलोमीटर भूभागावर कब्जा केला आहे. यामध्ये भारताचा 43 हजार किलोमीटरचा भूभागही येतो. 1949 मध्ये चीनने तिबेट, इनर मंगोलिया आणि पूर्व तुर्कस्तानवर कब्जा केला. त्याचवेळी, 1997 मध्ये ड्रॅगनने हाँगकाँग आणि 1999 मध्ये मकाऊचा ताबा घेतला. आजही चीनची विस्तारवादाची भूक भागलेली नाही. 2049 मध्ये चीनला अमेरिकेला मागे टाकून जगाची महासत्ता बनायचे आहे. त्यासाठी अतिशय नियोजनबद्ध कृती आराखडा चीनने आखला आहे. यादरम्यान तैवानच्या एकीकरणाचा प्रश्नही चीनला मार्गी लावायचा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेबरोबरचे चीनचे व्यापारयुद्ध विकोपाला जाताना दिसत आहे. दुसरीकडे, आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपावरून चीन आणि अमेरिकेतील संघर्ष युद्धाकडे जातो की काय, अशा शक्यता निर्माण होताना दिसताहेत. अशा तणावग्रस्त वातावरणात चीनच्या या छुप्या पोलिस ठाण्यांचा पर्दाफाश झाला आहे. याबाबत अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतलेली नाहीये. परंतु, न्यूयॉर्कनंतर आता जगभरातील सर्वच देश खडबडून जागे झाले असून, त्यांनी आपल्या देशांत चिनी गुप्त पोलिस ठाणी नाहीत ना, याचा शोध सुरू केला आहे.
चीनची एकूण युद्ध पद्धती आणि रणनीती पाहिली असता, या पोलिस चौक्यांचा धोका अधिक प्रकर्षाने लक्षात येतो. चीन एखाद्या भूभागावर कब्जा मिळवायचा असेल तर थेट कधीही युद्धाचा किंवा सैन्यबळाचा मार्ग अवलंबत नाही. आधी त्याविषयी दावा करायला सुरुवात करतो, त्यानंतर तिथे घुसखोरी करतो, काही बांधकामे उभी करतो, तेथे तैनात असणार्या सैनिकांशी झटापट करतो, आपल्या सामरिक सामर्थ्याचे दर्शन घडवून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर आमने-सामने युद्ध होईल अशी परिस्थिती तयार करून क्षमता पडताळून पाहतो. चिनी पोलिस चौक्या या धोरणाचाच एक भाग नाहीत ना, अशी शंका घेण्यास वाव आहे.
आज जगभरात चीनच्या डेट ट्रॅपची म्हणजेच कर्ज विळख्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत असते. गरीब आणि आर्थिक संकटात सापडलेल्या देशांना प्रचंड प्रमाणावर निधी देऊन त्या देशांच्या जमिनी, बंदरे, विविध प्रकल्प बळकावण्याची चिनी रणनीती यथावकाश जगासमोर आली आहे. श्रीलंका, पाकिस्तान यासारख्या देशांना या चिनी कर्ज विळख्यामुळेच भिकेकंगाल होण्याची वेळ आली. तशाच प्रकारचा हा चीनचा नवा सापळा आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबाबत जागतिक समुदायाने कठोर भूमिका घेणे आता गरजेचे झाले आहे. कारण, चीन हा अत्यंत अविश्वासू देश आहे, हे एव्हाना स्पष्ट झालेले आहे.
मोबाईल, टी.व्ही., अॅप्स अशा विविध माध्यमातून चीनने मोठ्या प्रमाणावर जगभरातील डेटा अवैधरीत्या संकलित केलेला आहे आणि त्याचा वापर करून चीनची सायबर गुन्हेगारी राजरोसपणाने सुरू आहे. मध्यंतरी अंतराळामध्ये सोडलेल्या उपग्रहांच्या माध्यमातून चीन विविध देशांतील गोपनीय माहिती संकलित करत असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे, या उपग्रहांमध्ये अंतराळात स्थापित झालेले अन्य देशांचे उपग्रह निकामी करण्याचे आणि त्यातील माहिती चोरण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले होते. चीनच्या या उपद्रवी कारवाया माहीत असूनही जागतिक समुदाय त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करत नाही याचे मूळ चीनच्या आर्थिक विकासात दडलेले आहे. आज जगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून चीन ओळखला जातो. अमेरिकेचा राष्ट्रध्वजही चीनमध्ये बनवला जातो इथवर प्रगत राष्ट्रांचे चीनवरील अवलंबित्व वाढलेले आहे.