कोलंबो, वृत्तसंस्था : लडाख-अरुणाचल सीमेनंतर आता हिंदी महासागरात सीमोल्लंघनाचे 'ड्रॅगन'चे मनसुबे आहेत. संशोधन प्रकल्पाच्या नावाखाली चीन आपले अद्ययावत हेरगिरी जहाज 'शी यान-6' ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेत मुक्कामी पाठविण्याच्या तयारीत आहे.
सप्टेंबरमध्ये जी-20 शिखर संमेलन आटोपले की, आम्हाला सर्व्हे जहाजासाठी मंजुरी द्यावी, अशी विनंती चीनने श्रीलंकेला केली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने त्यावर कुठलाही आक्षेप नोंदविलेला नाही. उलट श्रीलंकेच्या संरक्षण व परराष्ट्र मंत्रालयाला परवानगी द्यावी म्हणून शिफारस केली आहे. भारताने त्याला आक्षेप घेतला आहे.
श्रीलंका सरकार महिनाअखेर चीनच्या सर्व्हे शिपला औपचारिक परवानगी देईल, अशी शक्यता आहे. गतवर्षी संशोधनाच्या नावाखाली चीनचे 'युआन वेंग-5' हे जहाज श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरावर येणार होते, तेव्हाही भारताने आपला विरोध नोंदविला होता. 'वेंग-5'मध्ये स्पेस ट्रॅकर, क्षेपणास्त्र यंत्रणाही होती. संशोधनात या सुविधांची गरज काय, असा भारताचा सवाल होता. वर्षभरानंतर चीन पुन्हा आगळीक करत आहे.
दक्षिण किनारे टप्प्यात
श्रीलंकेच्या बंदरावर येणार्या चिनी जहाजाच्या टप्प्यात आंध्र प्रदेश, केरळ व तामिळनाडूतील अनेक सागरी किनारे येतात.
काय म्हणतात, श्रीलंकन तज्ज्ञ?
बंगालचा उपसागर, हिंदी महासागर क्षेत्रातील शांततेसाठी श्रीलंकेने परदेशी जहाजांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून घेतली पाहिजेत.
– उदित देवाप्रिया, थिंक टँक फॅक्टम, कोलंबो
भारताचा आक्षेप योग्यच आहे. भारत हा श्रीलंकेला मदत करत आलेला शेजारी व बलशाली देश आहे. श्रीलंका सरकारने चीनला परवानगी देऊच नये.
– असिरी फर्नांडा, सामरिक तज्ज्ञ, कोलंबो