Latest

मुख्यमंत्र्यांची सभा राजकीय शेवट ठरणार : भास्कर जाधव

मोहन कारंडे

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड येथे यापूर्वी झालेली अभुतपूर्व जाहीर सभा पाहिल्यानंतर रामदास कदम यांना या सभेला उत्तर देण्याची इच्छा आली आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयम दाखवायला हवा होता. आता खेडमध्ये येऊन ते कशाचे उत्तर देणार? 'गद्दारी केली, खोटे बोललो' हेच जनतेला सांगणार आहात का? असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा हे त्यांचे राजकीय शेवट ठरेल, असे भाष्य उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरीत येथे पत्रकार परिषदेत केले.

आमदार भास्कर जाधव यांनी शासकीय विश्रामगृहात शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. रविवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा खेडमध्ये होणार आहे. या सभेबाबत आणि विधिमंडळातील किस्से त्यांनी यावेळी सांगत शिंदे – फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे काय मुद्दे आहेत? ते जनतेसमोर काय मांडणार? अर्थसंकल्पातून कोकणाला काय दिले? की जे सभेमधून मांडू शकतात. केवळ रामदास कदम यांच्या हट्टामुळे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे आ.जाधव यांनी सांगितले.

नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोकणासाठी काहीच मिळाले नाही. केवळ काजू बोर्डाची घोषणा कोकणासाठी झाली आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्रात ठीकठिकाणी स्मारके उभारणार्‍या या राज्य सरकारने कोकणात पर्यटन दृष्टिकोनातून किंवा त्यांना कोकणात नेत्यांची स्मारके उभारण्याची आठवण झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराज, साने गुरुजी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बरिस्टर नाथ पै, मधु दंडवते यांची स्मारके उभारणे किंवा विकसित करण्याला निधी देण्याची आठवण या सरकारला झाली नाही, असा आरोप आ. जाधव यांनी केला आहे.

राज्यावर 6 हजार कोटींचे कर्ज असताना 6 हजार 300 कोटींच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये 87 टक्के भाजपला तर 11 टक्के शिंदे यांच्या 40 आमदारांना निधी मिळाला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांच्या 40 जणांची अवस्था काय झाली आहे, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. अर्थसंकल्पात अनेक चुका आहेत. गेल्या अनेक वर्षातील चुकीचा अर्थसंकल्प यावर्षी मांडण्यात आला आहे. अशा प्रकारचा अर्थसंकल्प यापूर्वी कधीच मांडण्यात आलेला नाही. मला अर्थसंकल्पावर खूप काही बोलायचे होते, परंतु भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाने ठरवून विधिमंडळात मला बोलू न देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे मला अत्यंत कमी वेळ बोलण्यासाठी देण्यात आल्याचे आ. भास्कर जाधव यांनी सांगितले.

विरोधी पक्षात असताना सर्व समाजाला व सरकारी कर्मचार्‍यांसह इतर घटकांना 'आम्ही सत्तेवर आल्यानंतर तुम्हाला पाहिजे ते देऊ' अशा वल्गना केल्या होत्या. आता हे सत्तेत आल्यानंतर सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे परिणाम फडणवीस सरकारला भोगावे लागत असल्याचे आ. जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT