सातारा; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांमध्ये खूप वेळा चर्चा झाल्या, अनेकदा एकत्र आले, मोदींच्यावर टिका केली. 2014 ला एकत्र आले, परत 2019ला एकत्र आले. मात्र, काहीही झाले तरी 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार आहेत. अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
सर्व विरोधी पक्षांचे नेते पाटणा येथे एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर दरे या आपल्या गावी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मोदी यांचे काम सत्तेसाठी, खुर्चीसाठी नाही ते देशासाठी, जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत. लोकांच्या भल्यासाठी ते कार्यरत आहेत. जगभरामध्ये त्यांचा करिष्मा दिसून आला आहे. त्यांना जगात आग्रहाचे स्थान आहे. अमेरिकेच्या सदनामध्ये त्यांना भाषण करण्याची संधी मिळते हे आपणा भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. विरोधक वैयक्तिक स्वार्थाने बरबटलेले आहेत. स्व:ताची खुर्ची कशी वाचवायची, आपले अस्तित्व कसे टिकवायचे यासाठी विरोधकांची धडपड सुरू आहे. त्यासाठी ते एकत्र आले आहेत. जेवढी मोदी यांच्यावर टिका झाली तेवढेच जनतेने त्यांना उचलून धरले आहे. जनतेनेच आता ठरवले आहे राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी नरेंद्र मोदी यांचीच देशाला आवश्यकता आहे, ती काळाची गरज आहे. 2024 ला पूर्ण मजबुतीने, बहुमताने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.