Latest

मुख्यमंत्रिपदासाठी तुम्हीच गद्दारी केली : मुख्यमंत्री शिंदे

Arun Patil

खेड, पुढारी वृत्तसेवा : मी गद्दार नाही, खुद्दार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी तुम्हीच गद्दारी केली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. खरी गद्दारी 2019 ला झाली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना, भूमिकेला तुम्हीच चुकीचे ठरवले, असा घणाघातही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

खेड येथील गोळीबार मैदानात झालेल्या सभेत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी रामदास कदम, गजानन कीर्तीकर, मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर, आमदार योगेश कदम आदी उपस्थित होते.

बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आणि ऐश्वर्य

आहे. बाळासाहेब हे तुमचे वडील आहेत. पण आमचे दैवत आहेत. तुम्ही सत्तेसाठी काय काय केले ते सर्वांनाच माहीत आहे. पण आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी कधीच गद्दारी केली नाही. हे सरकार खुद्दारांचे आहे, गद्दारांचे नव्हे, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. तसेच 'एमएमआरडी'च्या धर्तीवर कोकणसाठी प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केली. पक्ष दावणीला बांधला. धनुष्यबाण गहाण ठेवला. तो आम्ही सोडवला. बॉम्बस्फोट करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सत्तेचा डाव आखला. याकूब मेमनच्या कबरीचे तुम्ही उदात्तीकरण केले. राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नेहमी अपमान करतात. तो तुम्ही तोंड दाबून सहन कसा करता, असा सवालही त्यांनी केला.

370 कलम हटवणे आणि राम मंदिर बांधणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. असे बाळासाहेबांचे विचार जपणार्‍या व्यक्तींबरोबर आम्ही 50 जण गेलो तर आमचा निर्णय चुकीचा कसा ठरतो, असा सवालही शिंदे यांनी केला.

तुम्ही बाळासाहेबांंच्या विचारांचे नाही तर संपत्तीचे वारसदार आहात. बाळासाहेबांचा मुलगा व नातू त्यांच्या नावे मते मागतो, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

रामदास कदमांना तुम्ही संपवायला निघालात

आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला जातो. पण आजपर्यंत आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो आहोत. याच भावनेने आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. माझ्यावर 109 केसेस आहेत. तुमच्यावर किती आहेत? रामदास कदमांनी कोकणात शिवसेना मोठी केली. त्याच भाईंना तुम्ही संपवायला निघालात? योगेश कदम याची आत्ता राजकारणात सुरुवात होत आहे. त्याचीही राजकीय कारकीर्द संपवायला निघालात. हे सहन करण्याच्या पलीकडे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मी मुख्यमंत्री झाल्यापासून वर्षा बंगला सर्वांसाठी खुला आहे. मी सत्तेचा गर्व केला नाही. कधीही करणार नाही. ध्यानीमनी नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी मला मुख्यमंत्री केले. मी फिरणारा मुख्यमंत्री आहे. घरात बसून कारभार करणारा नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT