Latest

‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ महाराष्ट्रभर विस्तारणार : मुख्यमंत्री

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेने सुरू केलेली संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राईव्ह) ही केवळ महानगरपालिका कर्मचारी किंवा महाराष्ट्र शासन एवढ्यापुरती मर्यादित नाही. मुंबईतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेकडे माझे व्यक्तिश: लक्ष असून स्वच्छ, सुंदर, निरोगी, आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्तमुंबईसाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. मुंबईच्या धर्तीवर ही मोहीम राज्य शासनाकडून लवकरच महाराष्ट्रभर विस्तारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महानगरपालिकेच्या तीन परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक प्रशासकीय विभाग याप्रमाणे तीन वॉर्डांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. मोहिमेत सहभाग नोंदवतानाच स्वच्छतेच्या कामांची पाहणी शिंदे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपर (पश्चिम)मधील अमृतनगरमधील स्वच्छतेची पाहणी करतानाच जेट स्प्रेच्या साहाय्याने पाणी फवारणी करून रस्ता स्वच्छ केला. पुढे एम पश्चिम विभागात चेंबूर (पूर्व) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन केले. तसेच, स्वतः पाईप हाती घेत जेट स्प्रेच्या साहाय्याने उद्यानासमोरील रस्ता पाण्याने धुतला. त्यानंतर चेंबूर (पश्चिम)मधील टिळक नगरात जाऊन तेथे सह्याद्री मैदानाभोवतालचा पदपथ जेट स्प्रेच्या साहाय्याने पाण्याने धुऊन धूळमुक्त करण्यात आला.

धारावी बचाव मोर्चा विकासविरोधी : मुख्यमंत्री

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या धारावी बचाव मोर्चावरून टीका केली. ते म्हणाले की, धारावीसाठी काढलेला मोर्चा हा विकासविरोधी मोर्चा होता. धारावी आशिया खंडातील एक मोठी झोपडपट्टी आहे. तेथील जीवन उंचावले पाहिजे. त्यांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका सरकारची आहे. यापूर्वीचा जो कंत्राटदार होता, त्याचे कंत्राट का रद्द करण्यात आले. जर तुमचा अदानी यांना विरोध असेल, तर यापूर्वीच्या कंत्राटदारालाही का विरोध होता.
काही तडजोडी तुटल्या असतील, त्यामुळे हे सर्व काही घडत असेल. मात्र, सरकार संपूर्ण धारावीकरांच्या मागे आहे. हे लोक पूर्णपणे विकासविरोधी आहेत. प्रत्येकवेळी विकासाचे प्रकल्प थांबवण्याचे काम यांच्याकडून करण्यात येते; परंतु धारावीकरांच्या विकासात कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक फायदा होणार नाही. धारावीतील प्रत्येक माणसाचा आम्ही फायदा करू, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT