आदित्य ठाकरे 
Latest

आधी मतदारसंघाला तरी न्याय द्या!; मुख्यमंत्र्यांचा आदित्य ठाकरे यांना सल्ला

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मी येथून निवडणूक लढवणार, मी तिथून निवडणूक लढवणार, असे म्हणण्यापेक्षा अरे ज्या लोकांनी निवडून दिले, त्यांना तर न्याय द्या, असा सल्ला सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना दिला.

कोस्टल रोडच्या लोकार्पणप्रसंगी ठाकरे परिवारावर हल्लाबोल चढवत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोस्टल रोड सुरुवातीला एमएमआरडीए किंवा रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बांधण्याचा विचार होता. पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी (म्हणजे उद्धव ठाकरे) हा मार्ग मुंबई महापालिकाच बांधेल, असा हट्ट धरला. हा हट्ट कशासाठी यामध्ये मी आता जात नाही! इन्स्टाग्रामवर काहीजण फोटो पोस्ट करुन, कोस्टल रोड आम्ही केला असे म्हणत आहेत. पण त्यांनीच किती अडथळे आणले, हे त्यांनी आता सांगावे. देवेंद्र मुख्यमंत्री असताना केंद्राकडून पर्यावरणाच्या परवानग्या मिळवल्या, म्हणून हा कोस्टल रोड जलदगतीने पूर्ण होऊ शकला. पण श्रेय द्यायला मनाचा मोठेपणा लागतो.

कद्रू मनोवृत्तीचा माणूस हे कधीच करु शकत नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला. कोस्टल रोड परिसरासह महालक्ष्मी रेस कोर्स येथे 300 एकर जागेत सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून, त्यामुळे मुंबईकरांना मुबलक ऑक्सिजन उपलब्ध होईल, असा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

सिद्धिविनायक मंदिराचा होणार कायापालट

सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट करण्यात येत आहे. सिद्धी विनायक मंदिरासाठी आपण पालिका आयुक्त चहल यांना उज्जैन महाकाल मंदिराचा जो आर्किटेक्ट होता, त्याला आणायला सांगितले आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. सिद्धिविनायक मंदिराचा विकास तातडीने करण्यात यावा, यासाठी सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT