Latest

शिवरायांचे अप्रकाशित चित्र मिळाले युरोपात, फ्रान्समधील वस्तुसंग्रहालयात जतन

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक अप्रकाशित शिवकालीन चित्र युरोपमध्ये मिळाले आहे. ते प्रथमच प्रकाशात येत आहे. हे चित्र सतराव्या शतकातील गोवळकोंडा चित्रशैलीतील आहे. इतिहास संशोधक प्रसाद तारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

तारे म्हणाले, चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे करारी व प्रसन्न मुद्रा, डोक्यावर शिरोभूषण व तुरा, खांद्यावर शेला दिसत आहे. त्यांच्या डाव्या बाजूला कट्यार खोवलेली आहे. चित्रामध्ये महाराजांनी दोन्ही हाताची बोटे सहजतेने पुढ्यात एकमेकांवर ठेवली आहेत. एका मोकळ्या जागेत ते उभे आहेत, असे दाखविले आहे.

चित्रे अल्बम स्वरूपात

प्रस्तुत चित्राबरोबरच भारतामधील सतराव्या शतकातील कुतुबशहा, औरंगजेब, मादण्णा अशा अन्य व्यक्तींची चित्रेही या संग्रहात आहेत. अठराव्या शतकापासून ही सर्व चित्रे फ्रान्समधील लुईस चार्ल्सस या सरदार घराण्याच्या ऐतिहासिक वास्तुसंग्रहालयात होती. तेथून ती फ्रान्समधील सॅव्ही नावाच्या संग्राहकाच्या ऐतिहासिक वास्तुसंग्रहात हस्तांतरित झाली, अशी नोंद वास्तुसंग्रहाच्या रेकॉर्डमध्ये आहे. सध्या ही सर्व चित्रे अल्बम स्वरूपात सॅव्ही कलेक्शनमध्येच आहेत, असेही तारे यांनी सांगितले.

शिवकाळात भारतात अनेक प्रादेशिक चित्रशैली अस्तित्वात होत्या. त्यापैकी कुतुबशहाची राजधानी असलेल्या आंध— प्रदेशातील गोवळकोंडा येथे प्रचलित असलेल्या चित्रशैलीला गोवळकोंडा चित्रशैली असे म्हणतात. राज्याभिषेकानंतर तीन वर्षांनी महाराज दक्षिण भारताच्या मोहिमेवर गेले असताना त्यांची अनेक चित्रे काढली गेली. त्या सर्व चित्रांपैकीच हे चित्रदेखील असून, त्याचा चित्रकार मात्र अज्ञात आहे. युरोपियन देशांमधील अनेक वखारी सतराव्या शतकात भारतामध्ये होत्या. त्यातील काही वखारी गोवळकोंडा परिसरात व भारताच्या पूर्व किनारपट्टीवर होत्या. त्या वखारींपैकी कोणा फ्रेंच अधिकार्‍याने प्रस्तुत चित्रे विकत घेतली किंवा हस्तांतरित करून घेतली आणि यथावकाश आपल्या मायदेशी युरोपमध्ये पाठविली. त्यानंतर म्हणजेच अठराव्या शतकात ती तेथील लुईस चार्ल्स घराण्याच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहात दाखल झाली, असे तारे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT