Latest

Chhatrapati Sambhajinagar News | संभाजीनगर हादरले! मुलीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याने बापलेकाला जीपखाली चिरडले, एकाचा मृत्यू

निलेश पोतदार

वाळूज, पुढारी वृत्तसेवा, आपल्या मुलीच्या प्रेमविवाहासाठी मदत केल्याच्या रागातून पित्याने दुचाकीवर जाणारा मावस भाऊ व त्याच्या मुलाला जीपखाली चिरडल्याची भयंकर घटना (गुरुवारी) भरदुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेंदुरवादा ते सावखेडा रस्त्यावर घडली. धक्कादायक म्हणजे धडकेनंतर रस्त्यावर पडलेल्या पुतण्या जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर मारेकऱ्याने पुन्हा जीप मागे घेऊन त्याच्या डोक्यावरुन नेली. यात पुतण्या पवन शिवराम मोढे (वय २६, रा. जुने वझर, ता.गंगापूर) हा जागीच ठार झाला. तर शिवराम मोढे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, मारेकरी सचिन भागचंद वाघचौरे (वय ४३, रा. धुपखेडा, ता. पैठण) हा पसार झाला आहे. (Chhatrapati Sambhajinagar News)

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी सचिन वाघचौरे याच्या मुलीने दोन वर्षांपुर्वी आत्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केला आहे. या छुप्या लग्नाबाबत दोन महिन्यांपुर्वी वाच्यता झाली. हा प्रकार समजल्यानंतर भाचा असूनही सचिन वाघचौरे याने या प्रेमविवाहाला विरोध केला. त्याला हा प्रेमविवाह मान्यच नव्हता.

दरम्यान, शिवराम मोढे यांना या प्रेमविवाहाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मावस भाऊ सचिन याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. झाले गेले सोडून द्या, मुलीने जातीतच आणि भाच्यासोबतच लग्न केले आहे. हा विवाह मान्य कर असे समजावून सांगितले. मात्र, मोढे यांनी समजूत घातल्यानंतर या प्रेमविवाहासाठी मोढे यांनीच मदत केल्याचा सचिनच्या मनात संशय निर्माण झाला. या संशयातून तो आपल्या मावस भावावरच दात खाऊन होता. हा राग खदखदत असताना याचा काटाच काढू असा सचिनने निश्चय केला. त्यासाठी तो संधीची वाट पाहत होता.

गुरुवारी दुपारी शिवराम मोढे हे मुलगा पवनसोबत दुचाकीवर जात होते. त्याचवेळी मारेकरी सचिनही आपल्या जीपने (एमएच-२०- ईवाय-०६४५) याच रस्त्याने जात होता. बापलेक नजरेस पडताच त्याने जीपचा वेग वाढवत त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील शिवराम मोढे हे रस्त्याच्या खाली फेकले गेले. तर त्यांचा मुलगा पवन रस्त्यावरच कोसळला. तेव्हा सुडाने पेटून उठलेल्या सचिनने पुन्हा जीप मागे घेत वेग वाढवत पवनच्या डोक्यावरुन चाक नेले. यात पवनचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मारेकरी सचिनने जीप तेथेच सोडून धूम ठोकली. (Chhatrapati Sambhajinagar News)

पवनचा होता आठ दिवसांवर विवाह

या घटनेत मृत झालेल्या पवन मोढे याचा येत्या ४ एप्रिल रोजी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाहाच्या तयारीसाठीच बापलेक दुचाकीवर सोबत जात होते. तेव्हाच मारेकऱ्याने डाव साधला. घटनेची माहिती मिळताच वाळूजचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी शिवराम मोढे यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलीस ठाण्यात सचिन वाघचौरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने करत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT