छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाला, शौर्याला, विद्वत्तेला, कर्तृत्वाला, बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही. संभाजीराजांंच्या बलिदानाने गवताला भाले फुटले. हतबल झालेल्या मराठ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. आपल्या देशाची अखंड प्रेरणा, अखंड स्फूर्ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. लेखणी आणि तलवार चालविणारा प्रतिभासंपन्न राजा म्हणजे संभाजी महाराज. आज (दि. 14 मे) त्यांची जयंती. त्यानिमित्ताने…
अवघे 32 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी भारतीय इतिहासात जे शौर्य, धैर्य आणि औदार्य दाखविले त्याला तोड नाही. त्यांना प्रत्यक्ष पाहणारा फ्रेंच पर्यटक अॅबे कॅरे म्हणतो 'संभाजीसारखा पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र मी अन्यत्र पाहिला नाही.' संभाजीराजे शूर पराक्रमी तर होतेच; तितकेच ते महाबुद्धिमान होते. बालपणापासूनच ते अनेक विषयांत निष्णात होते. आजी जिजाऊ मासाहेब आणि वडील छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संस्कृत शिक्षणाची व्यवस्था केली. ते संस्कृत भाषेचे महापंडित होते. त्यांनी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. ते संस्कृत भाषेचे मोठे चिकित्सक होते. त्यांच्या पांडित्यावर आणि विद्वत्तेवर प्रभावित होऊन गागाभट्टांनी 'समयनय' हा ग्रंथ संभाजीराजांना अर्पण केलेला आहे. यावरून संभाजीराजांच्या विद्वत्तेची प्रचिती येेते. केवळ संस्कृतच नव्हे, तर हिंदी भाषेवर देखील त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी हिंदी भाषेतून नखशिख, नायिकाभदे आणि सातसतक हे तीन हिंदी ग्रंथ लिहिले. त्यांची हिंदी अभिजात होती. मराठी भाषेबद्दल त्यांना स्वाभाविकपणे अभिमान होता. परंतु जगाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, परराष्ट्र व्यवहार यासाठी अनेक भाषा ज्ञात असणे अत्यावश्यक आहे ही त्यांची भूमिका होती.
शिवरायांना संभाजीराजांबद्दल प्रचंड प्रेम आणि अभिमान होता. त्यांनी कधीही राज्याची अभिलाषा बाळगली नाही. संभाजीराजे शिवरायांना पन्हाळा येेथे म्हणाले, "दूधभात खाऊन तुमच्या पायाची सेवा करेन, परंतु राज्याची वाटणी नको." संभाजीराजे विनयशील, प्रेमळ, स्वराज्यनिष्ठ होते, तितकेच ते शूर, पराक्रमी, कर्तव्यकठोर होते. निद्रेचे चार तास सोडले तर वीस तास अखंडपणे शेवटच्या क्षणापर्यंत ते लढत राहिले.
शिवरायांच्या काळात औरंगजेब स्वत: महाराष्ट्रात आला नव्हता. परंतु संभाजीराजांच्या काळात सुमारे सात लाखांची फौज घेऊन तो स्वराज्यात उतरला. शंभूराजांना पकडण्यासाठी आणि रयतेचे स्वराज्य चिरडण्यासाठी त्याने जंग जंग पछाडले. तो धूर्त, कावेबाज, पाताळयंत्री आणि निर्दयी होता. बापाला, भावाला, मुलांना, अनेक सुुफी संतांना छळणारा औरंगजेब महाराष्ट्रात सुमारे 27 वर्षे ठाण मांडून होता. त्याला पूर्ण कल्पना होती की, मराठ्यांना चिरडल्याशिवाय संपूर्ण भारत एकछत्री अंमलाखाली येणार नाही. त्याला सर्व ताकदीनिशी प्रतिकार करण्याचे काम छत्रपती संभाजीराजांनी केले. एका वेळेस त्यांना मोगल, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, मोगल आणि अंतर्गत शत्रू यांच्याविरुद्ध लढावे लागले. परंतु ते हतबल, निराश किंवा नाउमेद झाले नाहीत.
संकटाला ते निर्भीडपणे सामोरे गेले. संकटसमयी ते लढणारे होते, रडणारे नव्हते. मोगल, पोर्तुगाल, इंग्रज, सिद्धीच्या तुलनेत त्यांच्याकडे अपुरी साधने होती. परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती, स्वभाषा, स्वसंस्कृती, वतन आणि प्रजेवर अपार निष्ठा या बळावर ते लढत होते. औरंगजेबाचे महत्त्वाचे केंद्र असणार्या बुर्हाणपुरावर त्यांनी हल्ला केला. जंजिरा जिंकण्याचा अंतिम टप्पा त्यांनी गाठला होता. गोवा जिंकण्यासाठी मांडवी नदी पार करण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबाने पैसे पेरले, अनेक किल्ले जिंकले, त्याने जंग जंग पछाडले; परंतु मराठा मुलखातील शिवशंभूच्या मावळ्यांची मनं त्याला कधीही जिंकता आली नाहीत. संभाजीराजांनी त्याला हैराण केले. त्यामुळेच औरंगजेबाचा दरबारी इतिहासकार खाफी खान म्हणतो, 'संभाजी म्हणजे मोगलांसाठी वडिलांपेक्षा दहापटींनी तापदायक आहे.' इतका दरारा संभाजीराजांचा होता.
युद्धाच्या रणधुमाळीत प्रजेच्या कल्याणाकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. त्यांनी अनेक न्यायनिवाडे केले. शेतकर्यांना भरघोस मदत केली. प्रजेच्या संरक्षणाला त्यांनी प्राधान्यक्रम दिला. महिलांच्या रक्षणासाठी आणि स्वातंत्र्यासाठी ते अत्यंत दक्ष होते. आपली महाराणी येसूबाईंना त्यांनी स्वराज्याचे कुलमुखत्यार केले. त्यांच्या नावाचा 'श्री सखी राज्ञी जयतू' असा शिक्का बनविला. आपल्या पत्नीला सर्वाधिकार देणारे संभाजीराजे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. संभाजीराजे निर्व्यसनी, नीतिमान आणि समतावादी होते. त्यांना भेदभाव मान्य नव्हता. ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांनी आपल्या सहकारी, सैनिकांना, सरदारांना अत्यंत प्रेमाने वागविले. याचे वर्णन समकालीन अॅबे कॅरे करतो की, 'ते वयोवृद्ध आणि समवयस्क सैनिकांना अत्यंत मायेने आणि आदराने वागवतात. जखमी सैनिकांना स्वत: भेटून औषधोपचारांबाबत चौकशी करतात.' यावरून त्यांचा प्रेमळपणा आणि विनयशीलता स्पष्ट होते. त्यांनी ज्याप्रमाणे स्वराज्यरक्षण आणि स्वराज्यसंवर्धनाचे कार्य केेले, त्याप्रमाणे त्यांनी धार्मिक परंपरा जतन करण्याचे देखील महान कार्य केले. मोगलांनी जेव्हा गंगाधर कुलकर्णी नामक व्यक्तीला सक्तीने मुसलमान केले होते, त्याला स्वधर्मात घेण्याचे काम संभाजीराजांनी केले.
शिवरायांनी शंभूराजाला बालपणापासून शौर्याचे, स्वाभिमानाचे, राजनीतीचे शिक्षण दिले. पुरंदर तहाच्या पूर्ततेसाठी आठव्या वर्षी संभाजीराजे मिर्झाराजे जयसिंगाच्या छावणीत गेले. वयाच्या आठव्या वर्षी स्वराज्य निर्मितीसाठी शत्रूच्या गोटात जाणारा पहिला बालवीर म्हणजे शंभूराजे आहेत. वयाच्या नवव्या वर्षी ते वडिलांसोबत आग्र्याला गेले. तेथे त्यांनी आपल्या वडिलांकडून स्वाभिमानाचे आणि साहसाचे शिक्षण घेतले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांना वाराणसीत स्वराज्यापासून दूर राहावे लागले.
शिवरायांनी दक्षिण भारत जिंकला. उत्तर भारत जिंकण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शंभूराजांनी नियोजन केले होते. दरम्यानल औरंगजेबाच्या सरदारांनी शंभूराजांना पकडले. त्यांची सुटका करण्यासाठी मोठा प्रयत्न झाला नाही, इतकी औरंगजेबाची दहशत होती. सरंजामदार, सनातनी आणि औरंगजेब यांनी संभाजीराजांना खूप छळले. सुमारे 39 दिवस औरंगजेबाने संभाजीराजांचा छळ केला. त्यांची विटंबना केली, त्यांना उंटावर बसवून विदुषकाचा पेहराव घालून अपमानित केले. डोळे काढले, जीभ कापली; परंतु संभाजीराजे औरंगजेबाला शरण गेले नाहीत. त्यांनी कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही.
आपल्या वडिलांनी, आजी-आजोबांनी निर्माण केलेले स्वराज्य, रक्षिलेली संस्कृती औरंगजेबाच्या चरणावर अर्पण केली नाही. त्यांचे प्रचंड हाल हाल केले. परंतु संभाजीराजे झुकले नाहीत, वाकले नाहीत. रडले नाहीत. मरण पत्करले; पण शरण गेले नाहीत. संभाजीराजांच्या त्यागाला, शौर्याला, विद्वत्तेला, कर्तृत्वाला, बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही. अशा शंभूराजाची प्रेरणा घेऊन पुढे राजाराम महाराज, धनाजी-संताजी, महाराणी ताराबाई आणि लाखो जनता औरंगजेबाविरुद्ध लढत राहिली. शंभूराजांच्या बलिदानाने गवताला भाले फुटले. हतबल झालेल्या मराठ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. आपल्या देशाची अखंड प्रेरणा, अखंड स्फूर्ती म्हणजे शंभूराजे. लेखणी आणि तलवार चालविणारा प्रतिभासंपन्न राजा म्हणजे संभाजीराजे आहेत.
डॉ. श्रीमंत कोकाटे