कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती राजाराम कारखान्यात महाडिक यांची 28 वर्षे सत्ता आहे. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा, अशी आमची भूमिका आहे. तसेच जिल्ह्यातल्या सर्व कारखान्यांचा ऊस दर दोनशे रुपये जास्त आहे. मात्र, 'राजाराम'चा ऊस दर दोनशे रुपये कमी आहे. म्हणूनच कोल्हापुरातले 12 हजार सभासद विरुद्ध बाहेरगावचे 600 सभासद, अशी लढाई असल्याचे आ. सतेज पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केले.
28 वर्षे महाडिक यांची सत्ता आहे. पाच वर्षे आमच्या ताब्यात सत्ता द्या, असे आवाहन करून पाटील म्हणाले की, वरील मुद्द्यांबरोबरच मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व देणे यांसह आणखी काही मुद्दे घेऊन आम्ही सभासदांसमोर जात आहोत.
'डी.वाय.' ची निवडणूक वीस वर्षे बिनविरोध
सध्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकीचा विषय आहे, त्यामुळे सत्ताधार्यांनी त्यावर बोलावे. प्रचारात आम्ही जे मुद्दे मांडले आहेत, त्यावर सत्ताधार्यांनी खुलासा द्यावा.
ज्यावेळी डी. वाय. पाटील कारखान्याच्या निवडणुकीचा विषय येईल, त्यावेळी त्याबाबत बोलू, असे म्हणत सतेज पाटील यांनी डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याची निवडणूक गेली वीस वर्ष बिनविरोध होत असल्याचे स्पष्ट केले.
आमचं ठरलंय… आता कंडका पाडायचा…
जसा उसाचा कंडका पाडला जातो, तसा या कारखान्याच्या विषयाचा कंडका पडला पाहिजे, अशी सभासदांची भूमिका आहे. म्हणून सभासदांनी हा विषय हातात घेतला आहे, अशी टॅगलाईन सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी चर्चेत आणली आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय, अशी टॅगलाईन त्यांनी वापरली होती. त्याचा आता कारखाना निवडणुकीत विस्तार केला आहे.